अकोला :  सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात खरं तर समाजाच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे. मात्र, या संकटाला 'संधी' मानणारं माणसांतील एक विकृत आणि भयावह रूप अनेक ठिकाणी पहायला मिळालं आहे. त्याचाच प्रत्यय आला आहे अकोल्यात. अकोल्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारं एक मोठं रॅकेटच अकोला पोलिसांच्या हाती लागलं आहे. यात आतापर्यंत एका डॉक्टरसह 19 आरोपींना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनचे 46 वायल्स पोलिसांनी जप्त केले आहेत. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींमध्ये अकोला शहरातील काही खाजगी कोविड केअर सेंटर्समधील नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. यासोबतच शहरातील काही मेडीकल स्टोअर्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. 


 असं हाती लागलं रॅकेट : 
 अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठी ससेहोलपट आणि संघर्ष सुरू आहे. या इंजेक्शनची मुळ किंमत 1475 इतकी आहे. कंपन्यांनुसार यात थोडा-फार फरक आहे. मात्र, इंजेक्शनच्या तुटवड्याला संधी मानत अनेकांनी याचा काळाबाजार करणं सुरू केलं. त्यामुळे इंजेक्शनची विक्री चढ्या दरात सुरू आहे. त्यातूनच एका रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात किंमत 25 ते 40 हजारांवर गेली आहे. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आणि काळ्याबाजाराच्या होत असलेल्या चर्चेतून अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी लक्ष घातलं. पोलिसांनी आपले 'पंटर' काळाबाजार होत असलेल्या ठिकाणी पाठवत याची खात्री करून घेतली. अखेर 23 एप्रिलला याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हे सर्व शहरातील काही मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी होते. या पाच जणांच्या चौकशीतून आणखी काही आरोपी निष्पन्न झालेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात 19 आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणात अकोला पोलिसांनी 3 मेला दर्यापूर तालूक्यातील येवदा येथील डॉ. सागर महादेव मेश्राम या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली अहे. त्याचा या काळाबाजारात नेमका काय सहभाग होता?, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलं नाही. 


 रूग्णांसाठी खरेदी केलेली इंजेक्शनही विकलीत :
 पोलीस तपासात काही संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. यातून काळाबाजार करणाऱ्या लोकांचं अतिशय असंवेदनशील रूप समोर आलं आहे. यातील काहींनी चक्क रूग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रयासाने मिळवलेली रेमडेसिवीर इंजेक्शनं संबंधित रूग्णांना दिल्याचे गेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंजेक्शनची बाटली काढून त्याचा रिकामा डबा रूग्ण आणि नातेवाईकांना दाखवला जात होता. आणि इंजेक्शनची बाटली बाहेर काळ्या बाजारात विकल्या जात होती. या संपूर्ण बाबीत एखाद्या रूग्णाच्या जिवितीचं नुकसान तर झालं नाही ना?, या दिशेनंही पोलीस तपास होणार आहे. 


 काळ्या बाजारात इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री : 
  या रॅकेटकडून ही इंजेक्शनं अव्वाच्या सव्वा किंमतीत गरजू रूग्णांच्या नातेवाईकांना विकली जात होती. अकोल्यातील काळ्या बाजारात एका रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत २५ ते ४० हजारांच्या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेत असलेल्या सर्वांची 'आंतरिक साखळी' (इंटर्नल चेन) पोलीस तपासात स्पष्ट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 या ठिकाणांवरून झाली आरोपींना अटक : 
 अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींमध्ये अकोला शहरातील काही खाजगी कोविड केअर सेंटर्समधील नर्सिंग स्टाफ सोबतच काही मेडीकल स्टोअर्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  अकोला शहरातील देशमुख हॉस्पिटल, हॉटेल रिजेन्सी, बिहाडे हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, जय श्रीराम मेडिकल, सार्थक मेडिकल, अकोला मेडिकल, वृद्धी मेडिकल, विश्व माऊली मेडिकल यांचा रेमडीसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजारात समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.


 अकोला रेमडेसिवीर काळाबाजाराचं मोठं केंद्रं? : 
 या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता अकोला हे विभागातील रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचं मोठं केंद्र तर नाही ना?, असा प्रश्न पडायला लागला आहे. या प्रकरणी अटक झालेले 19 आरोपी, त्यात एका डॉक्टरचा असलेला समावेश ही शक्यता अधिक दृढ करणारा आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची अटक होऊ शकते. मात्र, या प्रकरणात अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातील काही 'बड्या' माशांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस तपासात यातील कोणतंच नाव अद्यापही कसं समोर आलं नाही?. यात कोणते 'अर्थ' दडले आहेत?, हे प्रश्नही निर्माण होणारे आहेत. 


 एकीकडे काहींचा 'काळाबाजार', तर दुसरीकडे काहींचा 'सेवा-समर्पणा'चा 'आदर्श' : 
  अकोल्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार चर्चेत आहेच. मात्र, दुसरीकडे दोन मेडीकल दुकानांनी घालून दिलेल्या आदर्शांनी काळाबाजार करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. यातील पहिलं मेडिकल स्टोअर म्हणजे सिव्हिल लाईन्स चौकातील 'दत्त मेडिकल स्टोअर'. सेवाभावी दत्त मेडीकलने गेल्या महिनाभरापासून एक वेगळा सेवाभाव जपला आहे. ते रेमडीसीवर इंजेक्शन 'ना नफा, ना तोटा' तत्वावर रूग्णांना देत आहेत. त्यामूळेच एकीकडे इतर ठिकाणी काळ्या बाजारात 40-50 हजारांपर्यंत विकलं चाललेलं हे इंजेक्शन दत्त मेडीकलवर 1475 किमतीत मिळत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासन आणि मंत्रालय पातळीवर कौतुक झालं आहे. 
 
तर दुसरं मेडिकल आहे शहरातील आदर्श कॉलनी भागातलं तिरूपती बालाजी मेडीकल. या मेडीकलमध्ये एका पार्सलने मालकाला धक्काच बसला. त्यांच्या नावानं आलेल्या पार्सलमध्ये रेमेडीसीवरचे चक्क 90 इंजेक्शन्स होते. विशेष म्हणजे मेडीकल संचालकाने अशी कोणतीही मागणी नोंदविली नव्हती. ना यासाठी पैशांचा भरणा केला होता. या  90 इंजेक्शनचं सव्वादोन लाखांचं बिलही संबंधित औषध कंपनीला अदा करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर मेडीकलचे संचालक नितीन दांदळे यांनी ही सर्व 90 इंजेक्शन्स जमा केलीत. काळ्या बाजारात या इंजेक्शन्सची किंमत कमीत कमी 25 लाख असल्याचं बोललं जातं. या दोन घटनांनी अकोल्यातील मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीचंही दर्शन होऊन गेलं. 


अकोल्यातील रेमडेसिवीरच्या काळाबाजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणेच्या कामाचं मुल्यमापन होणं गरजेचं आहे. या काळात प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा असलेलं अकोल्यातील अन्न व औषध प्रशासन खातं नेमकं करतं तरी काय?. याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. सोबतच पोलिसांचे हात बड्या माशांपर्यंत पोहोचतील तरी कधी?, याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहेत. लोकांच्या जीवाशी खेळू पाहणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आवरलं नाही तर या प्रवृत्तींबरोबरच काळही सोकावेल, हे व्यवस्थेनं लक्षात घ्यावं एव्हढंच.