बीड : गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे दादासाहेब आंधळे यांनी 2020 साली तलाठी म्हणून कार्यरत असताना ऑनलाईन सातबाऱ्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे घेतलेली 240 रुपयांची रक्कमेचं लाचेत रूपांतर करून खोटा ट्रॅप त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यानंतर या  गुन्ह्यात मदत करतो व पंचनामा देतो असं सांगून खुद्द बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी 1 लाख रुपये लाच  मागितल्याचा आरोप आंधळे यांनी केला आहे. 


या सर्व प्रकारानंतर  खोटी कारवाई केली आणि पुन्हा एक लाख रुपयाची मागणी केल्यामुळे तलाठी आंधळे यांनी थेट पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान एसीबीच्या प्रमुखांनी काहीच कारवाई न करता उलट पाडवी यांना याबाबत माहिती दिली व पुढे पुरावा नाही, असं कारण सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तलाठी दादासाहेब आंधळे यांनी केला आहे.


पोलीस निरीक्षक पाडवी यांची तडकाफडकी बदली 


तर दुसऱ्या प्रकरणात गेवराई येथील पाणी पुरवठा विभागातील अभियंता शेख समद यांना एक हजाराची लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्यावरही पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी कारवाई केली होती. त्यानंतर समद यांचे भाऊ शेख जमालोद्दीन यांना तुमच्या गुन्ह्यात व दोषारोपत्रात मदत करतो असं सांगून पोलीस निरीक्षक पाडवी व त्यांच्या सहकार्यानने दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ही रक्कम 50 हजार रुपये ठरवण्यात आली होती. याबाबतची वॉईस रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शेख जमालोद्दीन व खुद्द तलाठी आंधळे यांनी पुराव्यानिशी एसीबीचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सादर करून गुन्हा दाखल करत कारवाईची  मागणी केली होती.


या दोन्ही तक्रारीवरून राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकानी याची दखल घेऊन बीड एसीबीतील पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. पाडवी यांची औरंगाबाद परिक्षेत्र या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.