अकोला : गेल्या वर्षभरात तूर चांगलीच चर्चेत आहे. गेल्या वर्षी तूर डाळ 200 रुपयांवर गेल्यामुळे सर्वसामान्यांसह सरकारही हादरलं होतं.  सध्या तुरीची खरेदी आणि पडलेले भाव यामुळे तूर परत चर्चेत आली आहे. मात्र तुरीच्या बाजारातील चढ-उतारांपासून दूर जात स्वतः सक्षम होण्याचा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर  आहे. हा पर्याय आहेय पीकेव्ही दालमिलचा.

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेली ही मिनी दालमिल अनेक शेतकऱ्यांना नवीन ओळख देऊन गेली. ही ओळख आहेय लघु उद्योजकाची. या मिनी दालमिलच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा 'शेतकरी ते उद्योजक'अशी ओळख देणारा प्रवास झाला आहे.

कोणताही शोध आणि संशोधन मानवी जीवनात क्रांती आणणारा असतोच. चाकाच्या शोधातून मानवी जीवनाला मिळालेल्या गतीनंही  आपल्याला तेच शिकवलं आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चौदा वर्षांपूर्वी केलेल्या एका अशाच संशोधनाने शेतकऱ्यांच्या जीवनात विकास आणि उद्योजकतेची नवी पहाट उजाडली आहे. हे संशोधन आहे मिनी दाल मिलचं.

 

आतापर्यंत अनेक शेतकरी आणि बचत गटांनी या मिलच्या माध्यमातून शेतकरी ते उद्योजक अशी झेप घेतली आहे.  या दाल मिलला आणखीही शेतकरीभिमुख बनविण्यासाठी विद्यापीठ निरंतर प्रयत्नात आहे. वाजवी किंमत आणि त्याला मिळालेल्या शासकीय अनुदानाच्या जोडीतून ही मिनी दाल मिल शेतकऱ्यांना उद्योजक बनण्यासाठी खुणावते आहे.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 20 ऑक्टोबर 1969  रोजी स्थापन झालं. आपल्या स्थापनेपासूनच या विद्यापीठाने संशोधन आणि शिक्षणाचा नवा ध्यास घेत वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 1990-91 मध्ये प्रामुख्याने विदर्भातील डाळ उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरु पाहणाऱ्या एका संशोधनाची मुहूर्तमेढ विद्यापीठात रोवली गेली. हे संशोधन होतं मिनी दाल मिलचं.


या संशोधनाला अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाचा पाठबळ होतं.  विदर्भात कापसोबातच तूर, हरभरा, उडीद, मूग आदी डाळवर्गीय पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. विदर्भात शेतमालावर प्रकिया करणारे उद्योगच नाहीत. यातूनच विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यानंतर विदर्भात आलेल्या शेतकरी आत्महत्येचं पिकाच्या मुळाशीही हेच कारण. 1990-91 मध्ये सुरु झालेल्या निरंतर संशोधनातून 1997 मध्ये मिनी दाल मिलच्या निर्मितीचं स्वप्न पूर्णत्वास आलं.

विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागातील कापणी पश्चात तंत्रज्ञान विभाग आणि कृषीशक्ती अवजारे विभागातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न फळाला आले होते. या मिनी दाल मिलच्या माध्यमातून डाळ उत्पादक शेतकरी उद्योजकतेकडे वळण्याच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

तुरीपासून मोठ्या प्रमाणात डाळ बनवण्यात येते. तुरीपासून डाळ बनविण्याची पद्धत इतर धान्यांपासून डाळ करण्याच्या प्रक्रियेपेक्षा काहीशी क्लिष्टच. या प्रक्रियेत भरपूर वेळ आणि मजूरही लागतात. शिवाय डाळीचा उताराही  कमी मिळतो. आताही ग्रामीण भागात तुरीपासून डाळ तयार करताना तेल लावून कोरड्या पद्धतीने डाळ तयार करणे आणि तुरी रात्रभर पाण्यात भिजवून डाळ तयार करण्याच्या पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीने तयार होणाऱ्या डाळीतील  प्रथिने आणि जीवनसत्वांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असते.

 

विद्यापीठाने मिनी डाळ मिल बनवताना या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आहेेत. साधारणतः 10 ते 12 हजार लोकसंख्या असणाऱ्या गाव समुहासाठी लागणारी तूर डाळ बनवण्याची क्षमता या मिनी दाल मिलमध्ये आहे. सामन्यतः 1000 ते 1200 पोती तुरीवर प्रक्रिया केल्यास ही गरज पूर्ण होईल. विद्यापीठाच्या या डाळ मिलची रचनाही अतिशय सुटसुटीत आहे.

धान्याची चाडी, रोलर मिल, वाताकर्षण पंखा, चाळणी संच, ऑगर कन्व्हेअर, फटका यंत्र, इलेक्ट्रिक मोटार अशा महत्वांच्या भागांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे डाळ बनवणे अतिशय सोपे आणि सरळ झाले आहे.

कशी होते ती प्रक्रिया?

साधारणतः 100 किलो तुरीपासून मिळणाऱ्या डाळीमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2 आणि चुरी व भूशीचे प्रमाण खालीलप्रमाणे असते :

घटक                                           वजन

तूर (साफ केलेली)                 100 किलो

फटका डाळ (ग्रेड १)               40 ते 45 किलो

ग्रेड २ डाळ                             20 ते 25 किलो

चुरी                                       2 ते 3 किलो

भुशी (टरफले व पावडर)        22 ते 27 किलो

कुठे मिळणार मिनी दालमिल :

अकोला :

१) मा दुर्गा प्लास्टिक्स प्रॉडक्ट्स, एमआयडीसी फेज 3, अकोला

मोबाईल क्रमांक : 09422163183

२) जलाराम इंजिनिअरिंग वर्क्स, एमआयडीसी फेज 2, अकोला.

मोबाईल क्रमांक : 09422163388

३) श्रीराम असोसिएट्स, एमआयडीसी फेज 3, अकोला.

मोबाईल क्रमांक : 09823090002

मराठवाडा : 

४) व्ही.के. मॅन्युफॅक्चरिंग अँड मशिनरी सप्लायर्स, तुलसी कॉम्प्लेक्स, जिल्हा उद्योग केंद्रासमोर, करेगाव रोड, परभणी.

मोबाईल क्रमांक : 09860549617

हरियाणा : 

५) ओसवाल इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पोस्ट बॉक्स क्रमांक 42, ओसवाल कॉम्प्लेक्स, जगधरी रोड, अंबाला कॅन्ट (हरियाणा) - 133001.

मोबाईल क्रमांक : 08814936888

* शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास या ठिकाणी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा :

कृषी अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

दूरध्वनी क्रमांक : 0724- 2258266

1997 मध्ये शेतकऱ्यांच्या दारात ही दालमिल गेल्यानंतर विद्यापीठ तेवढ्यावरच थांबलं नाही. कापणी पश्चात विभागाच्या संशोधनानंतर कृषीशक्ती आणि अवजारे विभागानेही आणखी तीन प्रकारच्या डाळ मिल संशोधित केल्या आहेत. सिंगल रोलर, डबल रोलर थ्री हॉर्स पॉवर आणि डबल रोलर 5 हॉर्स पॉवर अशी ही संशोधनं होत आहेत. यातील 3 हॉर्स पॉवरची मिनी दाल मिल एका दिवसातील आठ तासात 7 क्विंटल डाळ तयार करते. तर 5  हॉर्स पॉवरची मिनी डाळ मिल एका दिवसातील आठ तासात 15 क्विंटल डाळ तयार करते. तर कापणी पश्चात विभागाची दालमिलही दिवसभरात 5 ते 8 क्विंटल डाळ तयार करते.

या दालमिल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यातल्या आहेत आणि त्याला साथ मिळाली आहे सरकारची. राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि 'आत्मा' योजनेतून शेतकरी आणि बचत गटांना यासाठी 50 टक्के अनुदानाची सोय करण्यात आली आहे. या अनुदानातूनच शेतकऱ्याच्या पंखात उद्योजक होण्याचं बळ मिळालं आहे. अनेक राज्य आणि राष्ट्रीय प्रदर्शनात अकोल्याच्या या मिनी दालमिलने अनेक सन्मान आणि पुरस्कार पटकाविले आहेत.

दाल मिलची किंमत :

१) मिनी दालमिल 3 हॉर्स पॉवर (करासहित)               81-82  हजार

२) मिनी दालमिल 5 हॉर्स पॉवर - 3 मॉडेल (कर सोडून)  एक लाख 25 हजार

तूर उत्पादक असणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही मिनी दालमिल म्हणजे वरदानच ठरली आहे. आधी सोय नसल्याने प्रचलित पद्धतीने डाळ बनवल्यामुळे वेळ आणि प्रत मोठ्या प्रमाणात गमवावी लागत होती. आज गावोगावी शेतकऱ्यांच्या बचत गटांना या डाळ मिलने मोठी ओळख आणि पैसा दिला. शिवाय बचतगटातील लोकांना हक्काचा रोजगारही मिळवून दिला. पावसाळ्यातील  महत्वाच्या तीन महिन्यांशिवाय वर्षभर हा उद्योग सुरु असतो. कमी मेंटेनन्समुळे मिळणारा नफाही लाखोच्या घरातला. या मिनी दालमिलमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना कमी पैशांत आणि चांगल्या प्रतीची डाळ मिळत असल्याने तेही आनंदात आहेत.

देशातील कृषी विद्यापीठांची संशोधनं खर्या अर्थाने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या बांधावर अन दारात पोहोचली तर त्यांच्या उत्कर्षाची पाहत व्हायला वेळ लागणार नाहीये. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची मिनी दालमिल नेमकं त्याचंच उदाहरण म्हणता येईल. आजच्या परिस्थितीतून बाहेर येऊन एक नवी ओळख मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना पीकेव्ही मिनी दालमील हा सक्षम पर्याय होऊ शकतो.

पाहा व्हिडिओ :