जालना : तुरीची खरेदी होत नसल्याने राज्यातील शेतकरी एकीकडे हवालदिल आहे, तर दुसरीकडे या हतबलतेवर जालना जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी नामी उपाय शोधला आहे. जात्यावरच डाळ तयार करुन विक्री करण्याचा प्रयोग या पाच ते सहा महिला शेतकऱ्यांनी सुरु केला आहे.

गेवराई तालुक्यातील महिलांनी जात्यावर डाळ तयार करून विकण्याचा प्रयोग सुरु केला आहे. आतापर्यंत 12 क्विंटल तुरीची डाळ केली, त्यापैकी दोन क्विंटलची विक्री झाली आहे.



नैसर्गिक पद्धतीने जात्यावर डाळ तयार होत असल्याने शहरातून मोठी मागणी आहे. जालन्यातील धान्य महोत्सवात दोन क्विंटल डाळीची विक्री झाली. सध्या औरंगाबादमध्ये विक्री सुरु आहे.

100 किलो तुरीची डाळ बनवण्यासाठी दोन महिलांना 12 ते 15 दिवस लागतात आणि त्याच 100 किलो तुरीतून सरासरी 60 ते 65 किलो डाळ मिळते.



विशेष म्हणजे ही डाळ वजनाला हलकी आणि 10 ते 15 मिनिटात शिजते. खाण्यासाठी स्वादिष्ट असते.

या महिलांनी तयार केलेली डाळ पहिल्या दिवशी ज्या ग्राहकाने 150 रुपये किलो दराने 2 किलो नेली. त्याच ग्राहकाने दुसऱ्या दिवशी 15 ते 20 किलो डाळ खरेदी केली. याचाच अर्थ ग्राहकांना जात्यावरील डाळ पसंत पडते आहे.