अकोला : जिल्ह्यातील काल मतदान झालेल्या सातपैकी तीन बाजार समित्यांवर प्रस्थापितांनी आपली सत्ता राखली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या अकोला बाजार समितीवर महाविकास आघाडीनं निर्भेळ यश मिळवलंय. विशेष म्हणजे भाजप अकोल्यासह जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबत लढलाय. अकोला बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीनं एकहाती सत्ता आणलीय. सर्वच्या सर्व 18 जागांवर सहकार पॅनलनं एकतर्फी विजय संपादन केलाय. त्यांनी या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा धुव्वा उडवलाय. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्यानं सभापती राष्ट्रवादीचा होणारेय. गेल्या 50 वर्षांपासून अकोला बाजार समितीवर धोत्रे कुटुंबियांची सत्ता आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :
अकोल्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे गट आणि भाजप आघाडीचा विजय :
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक आहे. या बाजार समितीवर स्थापनेपासून पळसोबडे येथील धोत्रे कुटूंबियांची एकछत्री सत्ता आहे. धोत्रे घराण्याने 'सहकार गटा'च्या छत्रछायेखाली सर्व पक्षातल्या लोकांना एकत्र करीत येथे कायम सत्ता राखली आहे. सध्याचे खासदार संजय धोत्रे यांचे वडील दिवंगत माजी आमदार श्यामराव धोत्रे, संजय धोत्रे यांचे चुलतबंधू आणि माजी मंत्री दिवंगत वसंतराव धोत्रे, वसंतराव धोत्रेंचा मुलगा आणि सध्याचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वात या बाजार समितीवर सातत्याने या घराण्याची सत्ता राहिली आहे. आज झालेल्या या निवडणुकीतही हीच परंपरा कायम राहिली आहे. अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं एकत्र येत सहकार पॅनलच्या नावाखाली निवडणुक लढवली. या निवडणुकीत या आघाडीनं वंचितच्या नेतृत्वाखालील सेनेच्या एका गटाला सोबत घेत 'शेतकरी शिव पॅनल'च्या नावाखाली निवडणूक लढवली मात्र, यात वंचितच्या पॅनलचा सुफडा साफ करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं सर्वच्या सर्व 18 जागा एकहाती जिंकल्यात.
अकोला बाजार समितीचं सभापतीपद राष्ट्रवादीकडे जाणार! :
गेल्या 15 वर्षांपासून बाजार समितीचं नेतृत्व करणारे बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते शिरीष धोत्रे यांनी या आघाडीचं नेतृत्व करीत एकहाती विजय मिळविला. या निवडणुकीतही शिरीष धोत्रे तब्बल पाचव्यांदै संचालकपदी विजयी झाले आहेत. आघाडीत सर्वाधिक 9 जागा राष्ट्रवादीने जिंकल्यामूळे बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच सभापती असेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामूळे राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे सलग चौथ्यांदा बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. तर उपसभापतीपद भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. अकोला बाजार समितीतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 18
- राष्ट्रवादी : 09
- भाजप : 05
- काँग्रेस : 02
- ठाकरे गट : 02
विजयी उमेदवारांची नावे आणि पक्ष/आघाडी :
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी1) विकास पागृत ठाकरे गट2) दिनकर वाघ राष्ट्रवादी3) वैभव माहोरे भाजप4) संजय गावंडे भाजप5) चंद्रशेखर खेडकर राष्ट्रवादी6) राजीव शर्मा भाजप7) शिरीष धोत्रे राष्ट्रवादी8) दिनकर नागे राष्ट्रवादी9) राजेश बेले भाजप10) भरत काळमेघ भाजप11) ज्ञानेश्वर महल्ले काँग्रेस12) अभिमन्यू वक्टे काँग्रेस13) सचिन वाकोडे राष्ट्रवादी 14) रामेश्वर वाघमारे राष्ट्रवादी15) शालिनी चतरकर राष्ट्रवादी16) माधुरी परनाटे राष्ट्रवादी17) मुकेश मुरूमकार ठाकरे गट18) हसन चौधरी राष्ट्रवादी
अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती :
अकोट बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप आघाडीचा झेंडा :
अकोट बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी प्रचंड चुरस होती. तब्बल चार पॅनल एकमेकांच्या विरोधात येथे उभे ठाकले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचं सहकार पॅनल, ठाकरे गट-राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं 'शेतकरी पॅनल', वंचितनं सर्वपक्षीय बंडखोरांना घेत उभं केलेलं पॅनल आणि शेतकरी पॅनलमधून फुटलेलं चौथं बंडखोर पॅनल. मात्र, 'सहकार पॅनल'ने 18 पैकी तब्बल 15 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली आहे. यासोबतच व्यापारी, अडते आणि हमाल मतदारसंघातून तीन अपक्षांना बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडेंच्या नेतृत्वाखालील 'शेतकरी पॅनल'सह इतर तीन पॅनलचा पार सुपडासाफ झाला आहे.
अकोटमध्ये माजी आमदार संजय गावंडेंचा पराभव :
अकोट बाजार समितीत अनेक दिग्गजांना पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. यात ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे यांचा सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे गजानन डाफे यांनी पराभव केला. इतर पराभूत दिग्गजांमध्ये माजी सभापती आणि सध्याचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर, संचालक राजू मंगळे, विलास साबळे यांचा पराभव झाला.
नवख्या नेतृत्वाची बाजार समितीत 'एंट्री' :
या निवडणुकीत नेत्यांच्या घराण्याच्या दुसऱ्या पिढीनं बाजार समितीच्या राजकारणात 'एंट्री' केली आहे. जेष्ठ सहकार नेेेेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश हिंगणकर यांचा मुलगा धीरज हिंगणकर विजयी झाला आहे. यासोबतच बच्चू कडू यांच्या 'प्रहार'चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू हे सहकार गटाकडून विजयी झालेत.
अकोट बाजार समितीतील पक्षीय बलाबल :
- एकूण जागा : 18
- सहकार गट (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप) : 15
- अपक्ष : 03
विजयी उमेदवारांची नावं आणि त्यांचा पक्ष/आघाडी
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी1) शंकरराव लोखंडे सहकार2) अविनाश जायले सहकार3) रमेश वानखडे सहकार4) अंजली सोनोने सहकार5) अरूणा अतकड सहकार6) कुलदीप वसू सहकार7) गोपाल सपकाळ सहकार8) सुनिल गावंडे अपक्ष 9) रितेश अग्रवाल अपक्ष10) अजमल खा आसिफ खा अपक्ष11) प्रमोद खंडारे सहकार12) श्याम तरोळे सहकार13) गजानन डाफे सहकार14) विजय रहाणे सहकार15) बाबुराव इंगळे सहकार16) धिरज हिंगणकर सहकार17) प्रशांत पाचडे सहकार18) अतुल खोटरे सहकार
बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती :
बार्शीटाकळी बाजार समितीवर सहकार गटाने आपली सत्ता अबाधित राखली आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं 'सहकार पॅनल'च्या झेंड्याखाली एकत्र निवडणुक लढविली. यात 18 पैकी तब्बल 15 जागा जिंकत सहकार आघाडीनं बार्शीटाकळी बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली. तर वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. वंचितनं मिटकरींसह राष्ट्रवादीचे माजी सभापती विनोद थुटे यांना सोबत घेत निवडणूक लढविली. मात्र, त्यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सहकार गटाचं नेतृत्व भाजप आमदार हरीश पिंपळे आणि काँग्रेसनेते सुनिल धाबेकर यांनी केलं. बार्शीटाकळी बाजार समितीतील पक्षीय बलाबल :
- एकूण जागा : 18
- सहकार आघाडी ( काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट आणि भाजप) : 15
- वंचित-मिटकरी आघाडी : 03
बार्शीटाकळी बाजार समितीतील विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष/आघाडी
विजयी उमेदवार पक्ष/आघाडी1) मंगला गोळे सहकार2) गंगाबाई सोनटक्के सहकार3) महादेव काकड सहकार4) अशोक राठोड सहकार5) अशोक कोहर वंचित-मिटकरी6) कल्पना जाधव वंचित -मिटकरी7) गोपाळराव कटाळे वंचित-मिटकरी8) शेख अजहर शेख जमीर सहकार9) रमेश बेटकर सहकार10) अशोक इंगळे सहकार11) सुरेश शेंडे सहकार12) अनिलकुमार राऊत सहकार13) गोवर्धन सोनटक्के सहकार14) प्रभाकर खांबलकर सहकार15) महादेव साबे सहकार16) रूपराव ठाकरे सहकार17) वैभव केदार सहकार18) सतीश गावंडे सहकार
आता बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत आता येथून शेतकरी हिताचे कार्यक्रम गतिमान करावेत, हिच माफक अपेक्षा.