बडोदा : “बेळगावसह मराठी प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकतो. त्यासाठी सरकारवर दबाव टाकला पाहिजे,” असं मत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडलं. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पार पडला. यावेळी अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी विविध मुंद्द्यांवर भाष्य केलं.


या समारोप कार्यक्रमावेळी काही ठरावही घेण्यात आले. त्यात बेळगावचा मुद्दा नसल्याने उपस्थितांनी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, “बेळगावचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रासाठी भळभळती जखम आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी दिग्गजांनी मोठा लढा उभारला. पण हा लढा बेळगाव, निप्पाणी, कारवार शिवाय अपूर्ण आहे. ही तिन्ही शहरं महाराष्ट्रात सामाविष्ट होणार नाहीत, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार नाही.”

राजकीय पक्षांवर टीका करताना लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले की, “गेली 60 वर्ष बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक मराठी बांधवांनी मराठी भाषेची जपणूक केली आहे. पण यावर कुठलाही राजकीय पक्ष फारसा आग्रही नाही. राष्ट्रीय पक्षही यावर ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बेळगावमध्ये भरलेल्या गेल्या साहित्य संमेलनातील ठरावाप्रमाणे हा लढा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने असेल.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बेळगाव प्रश्नावर लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले की, “ज्या प्रमाणे संपूर्ण देशात राम जन्मभूमी आंदोलनाच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती केली गेली. त्याचप्रमाणे बेळगाव प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपलं म्हणणं कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.”

सीमावसियांकडून घोषणाबाजी

या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरुन काही ठराव देखील घेण्यात आले. मात्र, त्यात बेळगावचा मुद्दा नसल्यानं संमेलनासाठी उपस्थित सीमावसियांनी घोषणाबाजी केली.

अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्टॉल धारकांचे ठिय्या आंदोलन

दरम्यान, आयोजकांकडून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे स्टॉल धारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे नाराज स्टॉलधारकांची संमेलनस्थळी ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. पण आयोजकांनी दिलगिरी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

लक्ष्मीकांत देशमुख यांचे संपूर्ण भाषण पाहा