Bharat Sasane On Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : आजपासून लातूर येथील उदगीर येथे 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होत आहे. या निमित्तानं उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरणार आहे. यानिमित्तानं अध्यक्षांच्या भाषणाकडे लक्ष लागून आहे. तत्पूर्वी संमेलनाच्या आधी संमेलनाध्यक्ष भारत सासणे (Bharat Sasane) यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजामध्ये धार्मिक आणि प्रशासकीय कारणांमुळे मोठी अस्वस्थता पसरली आहे. यावर बोलण्याची एक लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे. मी अतिशय स्पष्टपणे माझ्या अध्यक्षीय भाषणातून यावरती बोलणार आहे. लेखकांनी स्वतः ठाम भूमिका घ्यावी असं माझं मत आहे. ती भूमिका मी मांडणार आहे, असं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी म्हटलं आहे.
साहित्य संमेलनात राजकीय नेते नकोत
सासणे यांनी म्हटलं की, सध्या लेखन व्यवहार फार चांगला नाही. साहित्य संमेलनात राजकीय नेते नकोत, परंतु राजकीय नेते सुध्दा साहित्यिक असतात असा एक विचार मांडला जातो. मोदी किंवा आरएसएस यामुळे ते झाले आहे हे मला सांगतां येणार नाही. ते मी अधिक स्पष्टपणे अध्यक्षीय भाषणात सांगेन, असं ते म्हणाले.
आताची परिस्थिती विचित्र
सासणे यांनी म्हटलं की, आताची परिस्थिती विचित्र आहे. संपूर्ण व्यवस्था भीतीदायक आहे. सर्व सामान्य लोकांना बोलण्याची भीती आहे. धार्मिक तेढ, राजकारण, समाजकारण यावर मी 17 वर्षांपूर्वी कादंबरी लेखन केले आहे. लेखक हा दृष्टया असतो. समाजातील घटनेबाबत विचार करतो. त्याने सत्यवचन करावे. आजची परिस्थिती विचित्र आहे, लेखकाला सर्व सामान्याला वाचा द्यावी लागेल, असं सासणे म्हणाले. सासणे म्हणाले की, राजकीय पक्षांच्या एकूण भूमिकेबाबत मला बोलायचे नाही. मात्र सर्व सामान्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटनेवर लेखक म्हणून व्यक्त होणे वेगळं आहे. हे सगळे स्पष्ट होणार आहे, असं ते म्हणाले.
हा मंच साहित्यिक आहे इथं वैचारिक चर्चा झाली पाहिजे
त्यांनी सांगितलं की, या परिस्थितीला व्यवस्था जबाबदार आहे. व्यवस्था घट विळखा घालून बसली आहे. सर्व सामान्य लोक का भीती खाली आहेत? यापर्यंत साहित्यिक पोहोचला पाहिजे. आपल्या राज्यात स्थिती बरी आहे. मात्र बिहार किंवा इतर राज्यात स्थिती बिकट आहे. आपण कोणास हीन लेखत नाहीत. असुरक्षित वाटणारा समाज असतो त्यावेळी बुद्धीरंजन आणि मनोरंजन करणाऱ्या साहित्याकडे वळतो आणि समाजाचे अधःपतन होतं, असं ते म्हणाले. हा मंच साहित्यिक आहे इथं वैचारिक चर्चा झाली पाहिजे, असंही भारत सासणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या