Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : कोरोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं. पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्या प्रमाणे 'वॉश माय हँडस्' असं म्हणतदेखील नाहीत. लेखक हे पाहतो आहे. आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्तारने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा अच्छे दिवस येतील, असा विश्वास वाटत असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी म्हटले.


लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आजपासून 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भारत सासणे यांनी आज अनेक विषयाला स्पर्श केला. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की,  एकूण उदासिनतेबाबत अधिक जाणकारांनी बोललं पाहिजे. काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाद देखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही अशी टीका केली गेली आहे. देशातील मोठ्या समूहाने धर्मांतर करणं, १९७२ चा मोठा दुष्काळ व त्या निमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत असेही त्यांनी म्हटले.


वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्वाच्या घटना अलिकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल भारत सासणे यांनी अध्यक्षपदावरून उपस्थित केला. 


मराठी साहित्यात मंटो नाही


आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या 'सादत हसन मंटो' ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवीय चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करूणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली असल्याचे सांगत मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही, या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. 


साहित्यिकांना चिंता वाटली पाहिजे


साहित्यांतर्गत काही भाषेचे प्रश्न आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. कपड्यावरून माणसं ओळखण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात भाषा बोलतात ते, आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती, असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठात नोंदविला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी 'संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे', असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे भाषेवरून माणसांची ओळख कशी करणार. प्राचीन भाषांचे काय करणार? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ते भारतीय भाषा आहे हे आता कोण सांगणार ?  असा सवाल सुद्धा भारत सासणे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला.