Akhil Bharatiya Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सद्य स्थितीसह विविध मुद्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी साहित्यिकांना विविध प्रश्नांवर भूमिका घेण्याचे आवाहन करताना उजव्या विचारसरणीवर जोरदार टीका केली. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे: 


थाळी वाजवण्याच्या कार्यक्रमावरुन टीका 


आपण अशा छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत असे संकेत मिळायला लागले आहेत. चिंतनशील लेखकाला अशावेळेस चिंता वाटत असते, वाटली पाहिजे. हे विध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या मुलांच्या हातामध्ये कोणता भिकेचा कटोरा देणार आहेत, याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळी वाजवली. वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरंतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन 'त्राहिमाम्' म्हणत सैरावैरा झाला होता. भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापटअशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.


विदुषकांपासून सावध राहण्याबाबत सूचना; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका 


"एक हजार क़ाबिल आदमी के मर जानेसे इतना नुकसान नही होता जितना, के एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता है" अर्थ असा आहे की लष्करातली एक हजार सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं, मात्र एखाद्या विदुषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. 'अहमक' म्हणजे विदुषक, सर्कशीत काम करणारा विदुषक इथे अभिप्रेत नाही. विदुषकवृत्तीचा मूढ. 'साहिबे एखतियार' म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदुषकप्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे. मौलाना रूमींनी विदुषकांपासून सावध राहण्याबाबत आपल्याला सूचित केलं आहे. पण इतकंच नाही. लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं, असंही भारत सासणे म्हणाले.


उजव्या विचारसरणीवर सासणेंची सडकून टीका  


कार्टूनच्या चित्रात दडलेला 'कॉमन मॅन' त्याच वेळेला लपतछपत येऊन पोहोचला. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता. कारण मोबाइलमधून हेरगिरी केली जाते. असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हटलं,


"तुम्हाला समजलं नाही? अमृतकाळाबद्दल?" लेखकाला काही समजलं नाही असं लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन..


दबल्या, भयभीत आवाजात पण उत्तेजित होऊन सांगू लागला..... अहोऽ..... त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे दोन थेंब ? ते मिळवण्यासाठी त्या बिचाऱ्याने वेषांतर केलं. रूपांतर केलं. छद्मरूप धारण केलं. फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला. तेही पुढे, पुढच्या रांगेत, अग्रभागी द्यायचे होते दोन थेंब अमृताचे. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलंत. तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलंत. तुम्ही त्याचा अपमान केला. उपहास केला. निर्भत्सना केली. तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही. तुम्ही त्याचा शिरच्छेददेखील केला. नसता केला तर, एकटा एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो! पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे दोन झाले-राहू आणि केतू. एकाकडे कुटील विचार, तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती. एकाकडे डोकं, दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती... राहूचे उपासक आता छद्मरूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपीउपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत. आणि त्यांना सूड उगवायचा आहे.


एक म्हणतो आहे, मी काशी. दुसरा म्हणतो, मी मथुरा. तिसरा म्हणतो आहे मी द्वारका, मी अयोध्या, मी... मी... मी! हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृतीरक्षक होतात. कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात. कधी ते ज्योतिषी होतात. कधी ते भाष्यकार होतात. राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरीवादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून आणि मोहीत करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे. आतामात्र त्या लोककथेप्रमाणेच समाजातले अनेक तरूण पुंगीवाल्याच्या मागे मोहीत होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे.


काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या समर्थनावरुन संमेलनाध्यक्षांची खोचक टीका :


- कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही तुमचा आणि आमचा झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उन्माद आणि उन्माद, जनतेच्या भोळ्या मनाशी चालवलेला हा खेळ, टीका उपद्रव लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय. भिकेत मिळालं? म्हणजे स्वातंत्र्यसेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध आणि दोन कवडीचीही किंमत नसलेल्या लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे. हे आपण उघड्या डोळ्याने पाहतो आहोत. काही कथित साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचाही मृत्यू होणार आहे. असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत? त्यामुळे संविधानाचाही अपमान होतो आहे. लेखक एकदा गावी गेला होता. एका बड्या घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्यावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटलं की, तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही, लेखक म्हणाला, पण तुम्ही त्यांना भुंकू नका असंदेखील सांगितलेलं नाही. 


लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दुःखी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र 'चतुर मौन' पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशोब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दुःखाला चिरडणंदेखील आहे.