जळगाव : 'अथानी कैरी तथानी कैरी झोका खाय गं', अशा खास खान्देशातील अहिराणी गाण्याचे स्वर तुमच्या कानावर पडले तर समजायचं की माहेरवाशिणी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने माहेरी आल्या आहेत. सध्या खान्देशातील अनेक गावात अशाप्रकारे झोक्यावर बसून महिला गाणी गाऊन आणि झोके घेऊन आनंद घेत असल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खान्देशातील अक्षय्य तृतीया म्हणजेच अखाजीचा सण महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जातो. कारण या एकमेव सणाच्या निमित्ताने सासरी गेलेल्या महिला या आपल्या माहेरी येत असतात. या सणाच्या निमित्ताने महिला सासरहून माहेरी आल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बालपणीच्या मैत्रिणींसोबत त्यांना भेटण्याचा आणि सुख-दुःख सांगण्याचा आनंद घेता येत असल्याने मन हलकं करणारा सण म्हणून सुद्धा या सणाकडे पाहिलं जातं.


पूर्वीच्या काळात सासरी गेलेल्या मुलीला लवकर माहेरी जाता येत नसे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धती असल्याने लहान मोठ्यांचे करताना स्वत:च्या जगण्यातील आनंद मनमोकळेपणाने घेता येत नसे. सासरची वडीलधारी मंडळी नेहमीच अवतीभोवती असल्याने आपलं सुख-दुःख सांगण्याची त्यांच्या पुढे मुभा नसल्याने अनेक महिलांचा कोंडमारा होत असे. एकीकडे असं चित्र असलं तरी अक्षय्य तृतीया या सणाच्या निमित्ताने माहेरी जाण्यात कोणत्याही सुनेला आडकाठी केली जात नसल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे. समवयस्क माहेरवाशिणी माहेरी आल्यावर आपल्या सासरची गाऱ्हाणी आणि सुख दुःख आपल्या मैत्रिणींना सांगण्यासाठी गावात झाडाला झोका बांधून त्यावर दिवसभर खेळत असत. यावेळी कधी आनंद घेतला जात असे तर कधी आपल्या दुःखाच्या आठवणी सांगताना अनेकींच्या डोळ्यात अश्रू येत असत.


काळाच्या ओघात आता फोन आल्याने सुख दुःख त्यावर व्यक्त केलं जात असलं तरी ग्रामीण भागात मात्र सासूरवाशीण महिला माहेरी येऊन गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत झोका खेळण्याची परंपरा आज देखील कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनेक गावात सध्या महिला झोका बांधून त्यावर गप्पा टप्पा मारुन तर कधी फुगड्या खेळून आणि गाणे गाऊन अशा प्रकारचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.


झोका खेळताना कोणतीही महिला आपल्या वयाचा विचार न करता अगदी लहान मुली प्रमाणे झोका खेळताना दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झोका खेळणे, शुभ कार्य करणे यासारखी कामं केली जात असली तरी याच दिवशी आपल्या वाडवडिलांना घागर भरुन खापरावरच्या पुरणपोळीचा आणि आंब्याचा रसाचा नैवद्य दाखवला तर आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी आणि शांतता राहत असल्याची अनेक कुटंबात श्रद्धा आहे. त्यामुळे घागर भरुन खापरावर पुरणपोळी करण्याचा बेत अनेक घरात आज पाहायला मिळत आहे.