बारामती : "साध्याचं सरकार हे घटना बाह्य सरकार आहे.  सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे घटनेचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल आणि हे दोन मंत्र्यांचे सरकार लवकरच कोसळेल. 
मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादीचा चांगला परफॉर्मन्स दिसेल आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशीला पांडुरंगाची पूजा करतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केला आहे. 


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे ते बारामती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ही राष्ट्रीय पातळीवरची सायकल रॅली पुण्यातून निघाली होती. त्याचा बक्षीस वितरण समारंभ  विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या बक्षीस वितरण सोहळ्याला  सुनेत्रा पवार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि अमोल मिटकरी उपस्थित होते. 


अमोल मिटकरी यांनी बारामतीत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून  पांडुरंगाची पूजा करतील असा विश्वास व्यक्त केला. मिटकरी म्हणाले, कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असते. परंतु, पण मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील. येणाऱ्या काळात हे सरकार पडणार आहे. त्यामुळेच एवढे दिवस होऊन देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. 


"सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने येणार असून हे सरकार औटघटकेच आहे. देवेंद्र फडणवीस यांना  पुन्हा विरोधी पक्षनेते व्हावं लागेल, असा टोला अमोर मिटकरी यांनी यावेळी लगावला. 


महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी निधी दिला नाही या आमदारांच्या आरोपंवर देखील अमोर मिटकरी यांनी टीका केली. "एकट्या शहाजी पाटील यांना 180 कोटी दिली आहे. सर्व आमदारांना अजित पवार यांनी कोट्यवधींचा निधी दिला. मात्र तरी  फक्त राष्ट्रवादीला निधी दिला, असा आरोप केला जातो.