Ajit Pawar : अजित पवारांनी आज पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी नवा विक्रम रचला आहे. त्यात महत्वाचं म्हणजे एकाच टर्ममध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे पहिलेच नेते ठरले आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राज्यभर रंगल्या होत्या. त्यानंतर ते काही वेळा नॉटरिचेबल झाले होते. ते राजकीय भूकंप करणार असल्याच्या चर्चा मागील तीन महिन्यांपासून सुरु होती. मात्र मी राष्ट्रवादीसोडून जाणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते बंड करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आणि अखेर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी सत्यात उतरला. 


पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. 


पहाटेच्या शपथविधीवरुन मागील काही दिवस आरोप प्रत्यारोप झाले होते. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप केले होते. या पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवारांनादेखील अनेकदा राजकारण्यांकडून आणि सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर अजित पवारांनी तो शपथविधी आज सत्यात उतरवला आहे आता यानंतर अजित पवारांच्या दुपारच्या शपथविधीची चर्चा होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. 


पाच वेळा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ


2010, 2012 मध्ये, 2019 मध्ये दोन वेळा आणि आता 2023 मध्ये अशा एकूण पाच वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असणार असून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहे. अजित पवारांनी ज्यावेळी 2019 मध्ये पहाटेच्या वेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार नव्हते मात्र यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आहे. 


'40 आमदार आणि 2 खासदार असल्याचा दावा'


राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 


हेही वाचा:


Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली