Who is PI Shekhar Bagde : मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे सध्या चर्चेत आहेत. ठाण्यातील स्थानिक भाजपासह अजित पवार यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. शेखर बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे 60 कोटी रुपयांची बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार भाजप नेत्यांनी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली. तर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बागडे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात चर्चेत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आहेत तरी कोण? त्यांची कारकिर्द कशी राहिली... जाणून घेऊयात...                              


करिअरची वादग्रस्त सुरुवात - 


ऑक्टोबर 2021 मध्ये मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून  चार्ज घेतला. मात्र याच दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक देत  असल्याचा आरोप केला. त्यामुळे बागडे यांची मानपाडा पोलीस ठाण्यातील कारकीर्द वादग्रस्त ठरली. 


भाजपला नडले, सक्तीच्या रजेवर -


भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात पीडित महिलेने केलेल्या आरोपानंतर शेखर बागडे यांनी जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. 
शेखर बागडे यांनी जाणीवपूर्वक परस्पर हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी  केला होता. त्यानंतर,पोलीस ठाण्यावर भाजपकडून मोर्चा काढण्यात आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी लावून धरली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोपर्यंत शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही असा पवित्रा घेतला. या प्रकरणानंतर शेखर बागडे सध्या सक्तीच्या रजेवर आहेत. 


शिंदेंशी जवळीक -


डोंबिवलीचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीवर ठाम आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदे यांचा वरदहस्त असल्यामुळे शेखर बागडे भाजप पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची  चर्चा भाजपमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. याच कारणामुळे भाजप आणि शिंदे (शिवसेना) यांच्यात वादाची ठिणगी पडली का? असा सूरही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. 


कसे राहिलेय करिअर -


नाशिकचे रहिवासी असलेले शेखर बागडे हे महाराष्ट्र पोलिसांत चर्चेतील पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मानपाडा येथे काम करण्यापूर्वी बागडे यांनी यापूर्वी एटीएसमध्ये काम केले आहे. त्यादरम्यान त्यांनी प्रभावी कामगिरी केली, ज्यासाठी त्यांना डीजीपीच्या हस्ते सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.  बागडे यांनी यापूर्वी ठाण्यातील ईओडब्ल्यूमध्येही काम केले आहे.  मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणांसह अनेक मोठी प्रकरणे सोडवली आहेत.  एवढेच नाही तर डोंबिवलीच्या आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमधील चोरीचाही उकल केली.  अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती.  श्रीकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे सदस्य असताना, त्या काळात बागडे यांच्यावर अनेक भाजपच्या लोकांनी कारवाईचे आरोप केले होते, तेव्हापासून ते भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रडारवर आले होते.