Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पुण्यात सकाळ माध्यम समूहाकडून 'दिलखुलास दादा' मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून, फडणवीसांवर थेट टीका का करत नाही? तसेच वाढती लोकसंख्या आदी मुद्यावरून भाष्य केले. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पीएम मोदी यांचे जाहीर कौतुक केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यास 100 टक्के आवडेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रॅपिड फायरमध्ये अलीकडे पठाण चित्रपट पाहिला, भगवी बिकीनी घातलेलं सुद्धा पाहिलं असल्याचे म्हणाले. त्यांनी वाढत्या लोकसंख्येवरून त्यांच्या शैलीत भाष्य केलं. आता बास झालं. अपत्य ही परमेश्वर अल्लाहची कृपा नसते, ती नवरा बायकोची असते, असे सांगत लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केले. 


फडणवीसांवर का बोलत नाही? 


अजित पवार यांना फडणवीसांवर थेट का बोलत नाही? याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आम्ही नेहमीच नेहमीच एकमेकांवर धावून जावं असं आपणास वाटतं का? अशी उलट विचारणा केली. ते पुढे म्हणाले की, मतमतांतरे असू शकतात. मात्र, आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही. आम्ही काही एकमेकांचा बांध रेटलेला नाही. एकमेकांच्या अंगावर जाऊन जावं, खुर्च्या फेकाव्या का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. आम्ही सातत्याने आक्रमक भूमिका मांडत असतो. त्यामुळे साटेलोटपणाचा हा अपप्रचार असल्याचं ते यावेळी म्हणाले.


राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर काय म्हणाले? 


अजित पवार यांना राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरूनही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याचे क्षमता आहे, लोकांमध्ये जाण्याची क्षमता आहे, त्यांना संधी दिली गेली पाहिजे. आम्हाला साहेबांनी संधी दिली. साहेबांना यशवंतराव चव्हाणांनी संधी दिली. ते पुढे म्हणाले की, माणसं पारखायची असतात, हिरे पारखायचे असतात. काही वेळा हे पारखत असताना गारगोटीसुद्धा हाती लागते. त्यामुळे खरा हिरा कोणता आणि खोटा हिरा कोणता हे निवड करताना कळालं पाहिजे. बोलायचं तर निधड्या छातीने बोलायचं असेही ते म्हणाले. त्यांनी अहमदनगरमधील तसेच पुण्यामधील काही राष्ट्रवादीमधील तरुण नेत्यांची नावे सांगितली.


अजित पवार यांनी राज्यात अस्थिरता असल्याचेही कबूल केले. यावेळी त्यांनी इतिहासाचे दाखले देत राज्यामध्ये अस्थिरता असल्याचे कबूल केले यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांचा करिष्मा असल्याचेही पुन्हा एकदा सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? हा प्रश्न तुम्हालाच मी विचारत असल्याचे त्यांनी मुलाखतकारांना उद्देशून सांगितले. भाजप नरेंद्र मोदींमुळेच देशभरात पोहोचल्याचे ते यावेळी म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या