Ajit Pawar PC : राज्यात महाबंड करुन, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ उपस्थित होते. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारसोबत आलो आहोत, आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो असं म्हणत अजित पवारांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आज आम्ही एक निर्णय घेऊ, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तशी आम्ही शपथ घेतली, विस्तार होणार आहे. इतर सहकारी मित्रांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. यासंदर्भात अनेक चर्चा सुरु होतील. वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील 9 वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी साहेब करत आहेत. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे.
विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहे. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो.
केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो आहोत. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार.
नागालॅंडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेल्या आहेत. काही जण आरोप करतील, साडेतीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआने काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो, त्यामुळे जातीयवादी हा आरोप योग्य नाही.
पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काही परदेशात आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी देखील मान्यता दिली.
VIDEO : Ajit Pawar Full PC : घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवारांचा थेट दावा ABP Majha
अजित पवारांसह 9 जणांचा शपथविधी
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.