Ajit Pawar NCP : शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीमधील प्रवेशावरून केलेल्या खोचक टीकेनंतर पुन्हा वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी शिंदे गटाकडून झालेल्या टीकेला आणि संघाकडून झालेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतलं नसतं, तर काय हाल झाले असते हे लक्षात त्यांनी घ्यायला हवं, अशा शब्दात अनिल पाटील यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतला आहे. 


महायुतीत मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये


अनिल पाटील म्हणाले की, रामदास कदम यांना महाराष्ट्राचा किती अभ्यास आहे हे पाहायला हवं. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत दूषित वातावरण होऊ शकतं. राष्ट्रवादीला सोबत घेतलं नसतं, तर त्यांचे काय हाल झाले असते हे लक्षात त्यांनी घ्यायला हवं. कदाचित त्यांना याचा अंदाज नसावं म्हणून त्यांनी ते वक्तव्ये केलं असेल. त्यामुळे उगाच महायुतीत मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. 


महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. राज्यातील तसेच देशातील प्रमुखांकडून मात्र कुठलंही महायुतीबाबत वक्तव्ये आलेलं नाही. माझं वरिष्ठांना सांगणं आहे की त्यांनी खालच्या लोकांना चुकीची वक्तव्ये करू नये असं सांगावं.  


राजस्थान, उत्तर प्रदेश मध्ये भाजपला का फटका बसला? 


अनिल पाटील यांनी भाजपला राजस्थान आणि उत्तर प्रदेशात बसलेल्या फटक्याचा उल्लेख करत ऑर्गनायझरने केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ऑर्गनायझरने याचा देखील अभ्यास करायला हवा की राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला का फटका बसला? तिथं अजित पवार होते का? अशी विचारणा त्यांनी केली. 






अमोल मिटकरींकडूनही जोरदार पलटवार


दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही पलटवार केला आहे. माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या