मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Ajit Pawar NCP) विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसली असून आगामी निवडणुकीत 60 पेक्षा जास्त जागा पक्ष लढवू शकतो अशी शक्यता पक्षातील वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जागांवर सर्व्हे (NCP Survey For Maharashtra Vidhan Sabha Election) केला जाणार असून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येतंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी काळात प्रत्येकजण सर्व्हे करेल आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील अशी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली. तर प्रफुल्ल पटेल यांनी आगामी काळात आम्ही सर्वच 288 जागांचे सर्व्हेही करणार असल्याचं म्हटलं आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यासह छोट्या घटकपक्षांचे जागा वाटप लवकरच पार पडणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वच 288 जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सर्व्हेमध्ये महायुतीत सर्वात चांगला रिपोर्ट ज्याचा असेल त्याला संधी देण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे.
लोकसभेतील अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रवादीचा सर्व्हे
लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत सर्व्हे निगेटिव्ह असल्यामुळे लोकसभेची तिकिट कापण्यात आल्याचा अनुभव आला. पक्षातील दिग्गज खासदार हेमंत पाटील असोत वा भावना गवळी असोत, त्यांना तिकिट न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी देखील अनुभवायला मिळाली. कदाचित हीच बाब लक्षात घेत आगामी काळात विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसू नये म्हणून पक्षानेच स्वतः सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे.
माढा आणि नगरमध्ये वेगळी परिस्थिती असती
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जर अहमदनगर किंवा माढा लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला मिळाली असती तर सध्या जी परिस्थिती दिसते आहे ती वेगळी पाहायला मिळाली होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी तर आम्ही संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव जवळपास निश्चित केले होते. तर दुसरीकडे तुतारी गटाचे सध्याचे नगरचे खासदार हेच आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असते असं देखील स्पष्ट केलं.
विधानसभेत राष्ट्रवादी- भाजपमध्ये अनेक जागांवरून वादाची शक्यता
आगामी काळात इंदापूर, कागल, कोपरगाव, पंढरपूर यासह अनेक मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात पहिल्या क्रमांकाला राष्ट्रवादी असली तरी दुसऱ्या क्रमांकावर भाजप असल्याचं पाहिला मिळत आहे. जशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती काही मतदारसंघात आहे त्याच्या उलटी परिस्थिती भाजपच्या बाबत देखील आहे. हा विषय सामोपचाराने सोडवला जाईल अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.
नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता
या सगळ्या गोष्टी एका बाजूला असताना दुसरीकडे नवाब मलिक यांचं काय? हा देखील प्रश्न प्रलंबित आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी नवाब मलिक हे आमच्यासोबत असून आगामी विधानसभेला आमच्याकडून त्यांचा विचार नक्कीच केला जाईल अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी नवाब मलिक विषयावरुन महायुतीत खटके उडण्याची दाट शक्यता आहे.
ही बातमी वाचा: