Maharashtra Politics Crisis:  महाराष्ट्रासाठी (Maharashtra) (2 जुलै) रोजीचा रविवार हा राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्याने भाजपचं पारडं जड झाल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'हे ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्यांनी अजित पवारांचं मंत्रिमंडळात स्वागत केलं आहे.


महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे केंद्रात मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकांना काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण त्याआधीच राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाने भाजपचे पारडे जड केल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.


अजित पवारांच्या या बंडाचा लोकसभा निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर यामुळे केंद्रातील आणि राज्यातील समीकरणं बरीच बदणार असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे. 


राष्ट्रवादीतील फूटीचा भाजपला फायदा? 


महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वात जास्त जागा या महाराष्ट्रात आहेत. तसेच राष्ट्रवादीची महाराष्ट्रातली बाजू चांगलीच खंबीर आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांच्या एकजूटीचा नवा चेहरा असणार असल्याचं म्हटलं जात आहे. याचदरम्यान अजित पवारांच्या बंडामुळे आता पवारांच्या घरामध्येच फूट पडली आहे. या सगळ्यामध्ये जर लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून जर एकजूट झाली तर यामुळे भाजपसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. 


आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीतील फुटीमुळे दोन्ही पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. पण आता अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे अजित पवारांचं हे बंड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


अजित पवारांच्या या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'मंत्रीमंडळातील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी अजून बराच अवकाश आहे. आम्ही महराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना 4 ते 5 जागाच मिळाल्या होत्या, मात्र या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना जागा मिळवणे अवघड असणार आहे.' 


त्यामुळे आता महाराष्ट्रातील या महानाट्याचा फायदा दिल्ली होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तर यावर विरोधी पक्षाकडून आता कोणती भूमिका घेतली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :


दिल्लीतून सुत्रं फिरली अन् आजचा राजकीय महाभूकंप घडला? पडद्यामागे नेमकं काय घडले ?