मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ला येथे घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली आणि सत्ताधारी पक्षात एक पाऊल पुढे टाकत राज्यातील जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. ते केवळ यावरच थांबले नाही तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घडलेल्या घटनेबाबत आत्मक्लेश आंदोलन देखील करायला लावले. एकंदरीतच मागील काही घटनांवरून अजित पवार आपली इमेज बदलू पाहत आहेत असं दिसतंय. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे बोलताना राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत जी दुर्दैवी घटना घडली यावर राजकारण न करता थेट या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी भर सभेत थेट राज्याच्या 13 कोटी जनतेची याप्रकरणी माफी मागतो अशी भूमिका घेतली आणि महायुतीतील इतर दोन घटकांना बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न केला. 


मी केवळ माफी मागून थांबणार नाही तर त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून देणार असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. 


राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका विरोधकांकडून केली जात आहे. सिंधूदुर्ग येथे जे घडलं त्यावरुन पूर्णपणे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. यामध्ये त्यांना यश देखील आलं. याकाळात सत्ताधारी पक्षाकडून मात्र कोणत्याही प्रकारची माघार न घेता जो पुतळा बांधण्यात आला तो नौदलाच्यावतीने बांधण्यात आला म्हणत हात झटकण्यात आले. मात्र अजित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकत घडलेल्या घटनेबाबत थेट माफी मागून टाकली. 


अहमदपूर येथे अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांच्याबाबत राज्यातील जनतेमध्ये चूक झाली तरी जबाबदारी स्वीकारुन पुढे जाणारा नेता अशी प्रतिमा तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ या एका उदाहारणावरुनच नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाने घरातीलच उमेदवाराविरोधात म्हणजेच सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणे हे चुकीचं होतं याबाबत देखील जाहीररित्या माफी मागितल्याचं पाहायला मिळालं. एकप्रकारे अजित पवारांनी एक पाऊल मागे सरत विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांना चूक झाली माफ करा या भावनेने आपलंस करण्याचा प्रयत्न केला. 


शिंदे-फडणवीसांच्या वादापासून दूर


राज्यात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असं वातावरण असताना अजित पवार यांनी मात्र कुठल्याही प्रकारच्या वादात न पडता थेट जनतेत जाऊन मतदारांना आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान का करायला हवं याची कारणे देताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेने आतापर्यंत नाशिक, पुणे, मुंबई, बीड, लातूर जिल्ह्यांचे दौरे पूर्ण केले असून आगामी काळात संपूर्ण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे दौरे करण्याचं नियोजन केलं आहे.


लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आपलंस करुन घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. यामध्ये बऱ्यापैकी ते यशस्वी झाल्याचं पाहिला मिळत आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरु होणाऱ्या या योजनेच्या नावात बदल करुन लाडकी बहीण योजना हे नाव तळागाळात पोहचवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाल्याचं पाहिला मिळत आहे. इतकंच नाही तर सदर योजना मुख्यमंत्र्यांनी नाही तर अजित पवार यांनीच सुरु केली असल्याचं परस्पेशन रुजवण्यात देखील पक्ष यशस्वी झाल्याचं पाहिला मिळत आहे.


ही बातमी वाचा: