उस्मानाबाद : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र घेण्यात आले होते. दरम्यान, पुढे निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. तर, आता राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून देखील राज्यभरात आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी मोहीम राबवली जात आहे. यासाठी स्थानिक महत्वाच्या नेत्यांकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 5 हजार शपथपत्र देण्यात आली असून, त्यातली 3 हजार शपथपत्र भरुन घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात असलेली ही लढाई आता कायदेशीर लढाईपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातील कार्यकर्ते आपल्याच ताब्यात असल्याचे कायदेशीररित्या स्पष्ट करण्यासाठी अजित पवार गटाकडून तयारी करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी कायदेशीर लढाईची तयारीसाठी अजित पवार गट तयारी करत असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या बंडखोरीचा 'अभ्यास'
ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली, त्याचप्रमाणे अजित पवारांनी देखील आपल्या सहकारी आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा फडकवला. दरम्यान, शिवसेनेमधील बंडखोरीचा मुद्दा न्यायालय आणि निवडणुका आयोगापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षातील बंडखोरी देखील निवडणुका आयोगापर्यंत पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेले कागदपत्रे आणि त्यांच्याकडून झालेल्या चुका या सर्वांचा 'अभ्यास' राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून केला जात आहे. त्या चुका टाळण्याचे प्रयत्न देखील करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहे.
शरद पवारांच्या सभेला अजित पवारांच्या सभेतून उत्तर?
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार हे अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिक आणि धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आता अजित पवारांकडून देखील शरद पवारांनी सभा घेतलेल्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. आज बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा होत असून, लवकरच कोल्हापूरमध्ये देखील अजित पवारांची सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: