पुणे : पुण्यातील नव्या कोऱ्या चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा अपघात झाला आहे. कोथरुडकडे येणाऱ्या रस्त्यावर PMPML बस चिखल असल्याने घसरली आणि जेसीबीवर आदळली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. नवीन पुलापासून अगदी 200 मीटरवर हा अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र शहरात PMPML बसच्या अपघातातदेखील वाढ झाल्याचं काही दिवसांपासून घडलेल्या अपघातातून समोर आलं आहे.


काही दिवसांपूर्वीच पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं उद्घाटन झालं होतं. मात्र काही प्रमाणात चांदणी चौकातील पुलाचं काम अपूर्ण असल्याचं दिसून येत आहे. आज सकाळी ही बस कोथरुडच्या दिशेने येत होती. त्यावेळी उतारावर ही बस घसरली आणि समोर असलेल्या जेसीबीवर जाऊन आदळली. समोर जेसीबी असल्याने सकाळी मोठा अनर्थ टळला अथवा ही बस अनेक लहान मोठ्या गाड्यांवर जाऊन आदळली असती तर मोठं नुकसान झालं असतं.


पुण्यातील चांदणी चौकात कायम मोठी गर्दी बघायला मिळते. रविवार असल्याने आज परिणामी गर्दी कमी असेल. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहे. बसचा अपघात झाल्याने या रस्त्यावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.


PMPML बसचे अपघात वाढले...


पुण्यातील दर दोन दिवसांच्या अंतराने PMPML बसचे अपघात होत आहे. कधी चालकाचं नियंत्रण सुटून तर कधी ब्रेक फेल झाल्याने हे अपघात होतात. यात मोठी जीवितहानी होत नाही मात्र बसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह कायम उपस्थित होतं. त्यातच काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत PMPML चालवून अनेकांचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर आली होती. PMPML थेट नो एन्ट्रीमध्ये चालवल्याने बसचा लहान अपघातदेखील झाला होता. हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक येथे ही घटना घडली होती. बसमधील दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यामुळे पुणे PMPML च्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे होता.


अपघात कधी थांबणार?


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Weekly Recap: चंद्रोत्सव, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका आणि लोकसभा निवडणुकीची तयारी; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी वाचा सविस्तरों