Ajit Pawar Banner Dharashiv : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार का याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली आहे. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील 'तेर'मध्ये आहे. तिथे अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर झळकले आहेत. तेर गावातील चौकाचौकात "तेरचे जावई ,आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार," अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.


'तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार'


मागील काही दिवसांपासून अशा काही राजकीय घडामोडी घडत आहेत ज्यात अजित पवार राजकारणातल्या चर्चांचे केंद्रबिंदू बनले आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी अजित पवार भावी मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स झळकले होते. आता पुन्हा त्यांच्या सासरवाडीत लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव जिल्ह्यातील 'तेर'मध्ये आहे. जिथे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बॅनर्स लावल्याचं स्पष्ट आहे. कारण सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याबाबत साकडं घातलं आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे. गावातील चौकाचौकात बॅनर्स लागले आहेत. 'तेरचे जावई, आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार' असा मजकूर या बॅनर्सवर आहे.


यापूर्वी लागले होते अजित पवारांचे बॅनर्स


मागे काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणात ते भूकंप घडवून आणतील, असंही बोललं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी 'मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार' असल्याचं स्पष्ट केलं होतं. शुक्रवारी सकाळ माध्यम समूहाकडून त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. 'दिलखुलास दादा' या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर पुण्यातील थेट कोथरुड परिसरात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर्स लागले आणि आता पुन्हा त्यांच्या सासरवाडीत अशाच आशयाचे बॅनर्स लागल्याने लेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. 


पुण्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही पुण्यात लागलेल्या पूर्वीच्या बॅनर्सवर लिहिलं होतं. या बॅनर्सवर अजित पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले होते. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले होते.