Ajit pawar Banner In Pune : पुण्यात सध्या सगळीकडे शहरातील (Ajit Pawar) बॅनर्सची चर्चा रंगताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक राजकीय बॅनर्स दिसून येत आहे. आता त्यातच अजित पवार यांचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहे. 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री', असा उल्लेख असणारे बॅनर्स पुण्यात लावण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे अजित पवार केंद्रबिंदू होते. या घडामोडीनंतर लागलेल्या या बॅनर्समुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणात ते भूकंप घडवून आणतील, असंही बोललं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी 'मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार' असल्याचं स्पष्ट केलं होतं. शुक्रवारी सकाळ माध्यम समूहाकडून त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. 'दिलखुलास दादा' या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर पुण्यातील थेट कोथरुड परिसरात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर्स लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. याचा केंद्रबिंदू राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. 2024 ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल केलं. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची 'दिलखुलास दादा' ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत अजित पवारांनी हे सूचक वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. याच मुलाखतीत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं होतं. नरेंद्र मोदींमुळेच भाजपचा करिष्मा देशभर चालला, मोदीनंतर कोण?, असं विचारल्यास एकही पर्यायी नाव समोर येत नाही, असं ते म्हणाले होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स
पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सध्या चांगलेच सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रात्रीच अजित पवार यांचे बॅनर्स झळकले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजित पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत.