Pune Weather : पुण्यात मागील काही (Pune Weather) दिवसांपासून दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी पावसाचं वातावरण आहे. मागील काही दिवस पुणेकर या वातावरणामुळे हैराण झाले आहे. त्यातच आता या उन्हापासून पुणेकरांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. या कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या कडाक्याच्या उन्हात पुणेकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  


26 आणि 27 एप्रिल रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


आरोग्याची काळजी घ्या...


पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच कोरोनाचे आणि H3N2 चे रुग्णांमध्येदेखील काही प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हापासून आणि बाकी संसर्गजन्य रोगापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.  


शेतकरी चिंतेत...


मागील काही दिवसांपासूव राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत आहेत. त्यासोबतच काही प्रमाणात अवकाळी पाऊसदेखील पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.


उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?


-फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.
- कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.
- पुरेसं पाणी पीत रहा.
- सुती कपड्यांचा वापर करा
- उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
- उपाशीपोटी घराबाहेर पडू नका
- तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळा.
- गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.