शिर्डी : 'सुबह का भुला शाम को घर आया, तो उसे भुला नही कहते...' असे म्हणत शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उद्धव ठाकरे गटातील प्रवेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही उपस्थित होते. 


पूर्वीचा कोपरगाव आणि त्यानंतर शिर्डी लोकसभा नामांतर झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ.. आत्तापर्यंत शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली. 2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला. 2009  साली काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव करत वाकचौरे खासदार झाले. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच शिवबंधन तोडून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारी घेतल्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अचानक उमेदवारी मिळाल्याने अवघी 17 दिवस प्रचार करत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले भाऊसाहेब वाकचौरे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये रमले नाहीत आणि अवघ्या वर्षभरातच त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 साली स्वबळावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणीही वाकचौरे यांना अपयशाला सामोर जावं लागलं. 2014 पासून भाजपात असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2019 च्या लोकसभेत अपक्ष उमेदवारी केली मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. आगामी 2024 च्या दृष्टीने पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले असून आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केलाय..






2019 मध्ये शिवसेना भाजप एकत्र होती मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत.. बदललेल्या समीकरणांनुसार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत खासदारकीची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.. 2009 पासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत, पूर्वी उद्धव ठाकरे गटात असलेले लोखंडे सध्या शिंदे गटात दाखल झालेले आहेत.  रामदास आठवले यांनी सुद्धा यावेळी शिर्डीतून उमेदवारी मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आतापर्यंत जनता माझ्या पाठीशी होती, यापुढे राहील असा विश्वास शिंदे गटाचे खासदार लोखंडे यांनी व्यक्त केलाय.