अहमदनगर : पारनेर मधल्या शिवसेना नगरसेवक फोडाफोडी मागे नेमकी कोणाची फूस? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.


पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची 26 जूनला पारनेरमध्ये जाऊन अचानक भेट घेतली. आमदार निलेश लंके यांनीच ट्विटरच्या माध्यमातून पार्थ यांच्या दौऱ्याची माहिती दिली. इतकंच नाही तर पार्थ यांनी लंके यांच्या घरी कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांशी गाठीभेटी केल्या आणि स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती घेतली.




पार्थ यांच्या पारनेर दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पुन्हा राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाल्याचे हे स्पष्ट संकेत होते. याचा प्रत्यय बरोबर एका आठवड्याने शिवसेनेचे नगर पंचायतीतील पाच नगरसेवक फुटल्यानंतर आल्याची तालुक्यात चर्चा आहे.


शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बारामतीत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुचली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोपही उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला.




मात्र पक्ष प्रवेश करताना अजित पवार अनुकूल नसल्याचं आमदार निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण राष्ट्रवादीने प्रवेश न दिल्यास या पाच नगरसेवकांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं नगरसेवकांनी स्पष्ट केल्याने त्यांना अखेर प्रवेश दिल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी देत आहे.


पण जर असं असेल तर मग या घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांची पारनेर भेट निव्वळ योगायोग कसा मानता येईल असा सवाल आता शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची या फोडाफोडीच्या राजकारणाला फूस आहे का अशी चर्चा सध्या या निमित्ताने सुरू झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :