Ahmednagar News : काही परंपरा वर्षानुवर्षांपासून जपल्या जातात. मात्र काही अघोरी प्रथा देखील आजच्या विज्ञानयुगात सुरु असल्याचं दिसून येतं.  अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील (Pathardi News Update) हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा (Rahad Yatra) संपन्न झाली. या यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवानी पायाने चालण्याची परंपरा आहे. गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सापडलं होतं. त्या निमित्तानं दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते.


नेमकी कधीपासून ही परंपरा जोपासली जाते? त्याच्यामागची नेमकी श्रद्धा काय? याबाबत जाणून घेऊयात.


या ठिकाणी दरवर्षी अशीच भाविकांची लांबच लांब रांग लागते. ती रांग असते पेटत्या विस्तवावरून अनवानी चालण्यासाठी. देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्याने आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा अहमदनगरच्या हनुमान टाकळी येथे जवळपास 250 वर्षांपासून जपली जात आहे. या यात्रेला जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामधून देखील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहात असतात.  


हनुमान टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केल्याचे ग्रामस्थ सांगतात. येथील हनुमानाकडे एखादा नवस केला तर तो पूर्ण होतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. नवसपूर्ती झाली तर मंदिरासमोरील विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे.. यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर 12 फुट लांबीचा, 2 फूट खोल, अडीच फूट रुंद चर खोदला जातो. त्यात बोरीच्या झाडाच्या लाकडं पेटवली जातात आणि भाविक या पेटत्या विस्तवावरून चालतात.


कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात या यात्रेमध्ये खंड पडला होता. यंदा मात्र कुठलेही निर्बंध नसल्याने भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी करण्यात आली. 
 
नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही- अंनिस


दरम्यान, नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसच्या रंजना गवांदे यांनी म्हटलं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणही अशा प्रथा पंरपरा जोपासना या हनुमान टाकळीत पाहायला मिळतात.