अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करणं बसप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चांगलंच महागात पडणार आहे. बसपच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल निलंबित केलं जाणार आहे, तर राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांबाबत उद्या निर्णय घेतला जाणार आहे.


बसपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी चौघा नगरसेवकांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपने उमेदवार उभे केले होते, आणि ते निवडूनही आले. मात्र आता झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला. त्यांच्यासोबतच बसपच्याही चार नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर निवडून दिला.

बसपने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं साखरे यांनी सांगितलं. या कारवाईबाबत कुठलेही पत्र किंवा नोटीस अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचं बसपचे गटनेते मुदस्सर शेख यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही, तर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय सत्तेत राहण्यासाठी स्थानिक पातळीवर घेतला असून निलंबनाची नोटीस मिळाली तर त्याबाबत खुलासा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत 18 नगरसेवकांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 18 नगरसेवकांचं निलंबन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला?

अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.

पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली.

भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने आधीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठिंबा देऊ नये, किंवा त्यांच्या बाजूने मतदान करु नये, असे स्पष्ट आदेश पक्षाच्या वतीने असतानाही भाजपला मतदान करुन पक्षादेश डावलल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते.