अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आता सरपंच-उपसरपंच यांची देखील निवड करण्यात आली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेल्या वाळवणे गावात चक्क पती-पत्नीच्या हातात गावाचा कारभार सोपवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी तर जयश्री यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.


अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेले वाळवणे गाव. 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. गावात एकूण नऊ जागा होत्या, त्यापैकी चार जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित जागांसाठी निवडणूक झाली. सचिन पठारे आणि त्यांची पत्नी जयश्री पठारे यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि दोघांचीही बिनविरोध निवड झाली. त्यानंतर वाळवणे ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण आले. सचिन पठारे यांनी दहा वर्षे गावात सामाजिक कार्य केले. त्याचीच पावती म्हणून गावकऱ्यांनी गावाचा कारभार सचिन पठारे आणि जयश्री पठारे या पती-पत्नीच्या हातात सोपवला. ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी तर त्यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.





जयश्री यांच्या लग्नाला 13 वर्षे झाली आहेत. जयश्री यांचे वडीलही सामाजिक कामात अग्रेसर आहेत. तोच वारसा जयश्री यांनी देखील जपला. लग्न झाल्यानंतर घरकाम करता करता सामाजिक काम करण्याची जयश्री यांची इच्छा होती. त्यामुळे पहिल्यांदाच जयश्री यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. त्यातच महिला आरक्षण आल्याने ग्रामस्थांनी एकमताने जयश्री यांची सरपंचपदी निवड केली. सरपंचपद मिळल्याने गावाचा विकास करण्याची संधी मिळाली असून महिला सक्षमीकरणाबरोबर गावाचा विकास करणार असल्याचा विश्वास नवीन सरपंच झालेल्या जयश्री यांनी व्यक्त केला.





सचिन पठारे यांनी देखील पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यातच पत्नी सरपंच आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे स्वतः उपसरपंच झाल्याने गावाचा चांगला विकास करणार असल्याचे सचिन पठारे यांनी सांगितले. इतकेच नाही तर "पत्नी सरपंच आल्याने सर्व निर्णय घेण्याचा अधिकर हा पत्नीलाच असणार आहे, आणि जर विकासकाम करताना काही मदत लागली तर पती आणि उपसरपंच या दोन्ही नात्याने मदत करणार" असं सचिन पठारे यांनी सांगितलं.





ग्रामपंचायत म्हटलं की सरपंच-उपसरपंचपदासाठी किती कुरघोड्या होतात हे आपण पाहतो. मात्र वाळवणे गावात कुठलेही वादविवाद न करता गावचा संपूर्ण कारभार पती-पत्नीच्या हातात सोपवला आहे. विशेष म्हणजे सचिन पठारे यांनी 10 वर्ष सातत्याने गावात केलेले सामाजिक कार्य आणि जयश्री पठारे यांची काम करण्याची जिद्द पाहून हे दोघेही गावाचा विकास चांगला करतील असा विश्वास वाळवणे गावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.


वाळवणे गावाची जबाबदारी सचिन पठारे आणि जयश्री पठारे या जोडीच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे या जोडीला संसाराचा गाडा हाकता हाकता गावगाडा देखील हाकावा लागणार हे नक्की.