अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून रद्द करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुणे जिल्ह्यातील शिरुर इथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.


अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावेळी या विभागात कोरोनाचे 17 रुग्ण उपचार घेत होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 9 नोव्हेंबर 2021 रोजी या अग्निकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं होतं. अग्निकांड प्रकरणी ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.


जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणी सुरुवातीला दोन कर्मचारी आणि दोन डॉक्टर अशा चार जणांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. तर डॉ. सुनील पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला होता. 


या अग्निकांड प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आला तरी तो अद्याप उघड झालेला नाही. त्यामुळे घटनेला जबाबदार कोण? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चार महिने उलटूनही या दुर्घटनेतील 14 मृतांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच राज्यपालांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 च्या पोटनियम (5) खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. शिवाय नगरजवळीलच शिरुर इथे सोयीच्या ठिकाणी डॉ. पोखरणा यांना पदस्थापना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.