Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये काल (शनिवारी) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी एकूण 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेकजण होरपळले आहेत. दरम्यान, अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला  लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र,  शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. तर याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.


अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Ahmednagar collector Rajendra Bhosale) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. काल (शनिवारी) सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये (Ahmednagar Fire) अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळी घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 


भयावह अन् भीषण आग  


रुग्णालयाला आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून मन सुन्न होतं. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


दोषींवर तात्काळ कारवाई : नवाब मलिक 


अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ राज्य शासनाकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय. 


आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांची मदत : राजेश टोपे 


अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला राज्याकडून तातडीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय.



ICU मध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ 


गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाच्या ICU मध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईत अनेक रुग्णालयातील ICU विभागामध्ये आग लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. शिवाय विरार, पालघरमध्ये अशाप्रकारच्याच घटना घडल्या होत्या. विरार येथील रुग्णालयात 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नागपूर 9 एप्रिल रोजी वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. या सर्व भीषण घटना एप्रिल 2021 मध्ये घडल्या होत्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


कधी आग, कधी वायुगळती! कोरोना काळात रुग्णालयातील दुर्घटनांमध्ये राज्यात शेकडो निष्पापांचे बळी; जबाबदार कोण?