fire breaks out at hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. ही घटना पहिली नक्कीच नाही. कोरोना काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये उपचारासाठी आलेल्या शेकडो निष्पापांचे बळी गेले आहेत. घटना घडल्यानंतर मृतांच्या परिवाराला मदत दिली जाते. दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं जातं. काही काळ राजकीय मंडळी त्यांचं राजकारण सुरु ठेवतात. मग कालांतरानं सर्वजण हे विसरुन जातात. अशा घटना घडू नयेत यासाठी मात्र काळजी घेतली जात नाही किंवा तशा उपाययोजना देखील केल्या जात नाहीत. 


कोरोना काळात घडलेल्या काही दुर्घटना


आज आज दुपारच्या सुमारास अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सात जण भाजले गेल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. 


Ahmednagar fire LIVE Updates : अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयातील ICUला भीषण आग, 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू


23 एप्रिल 2021- विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला मध्यरात्री आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते.


21 एप्रिल - नाशिक ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली होती. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला होता. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


9 एप्रिल - नागपुरात कोविड सेंटरला लागलेल्या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू
नागपूर 9 एप्रिल रोजी शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले होते. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं होतं. मात्र या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.


26 मार्च - मुंबईतील भांडूपमधील कोविड रुग्णालयात आग, आगीत 11 रुग्णांचा मृत्यू
26 मार्च रोजी घडलेल्या घटनेत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती या आगीत कोविड रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु होती. त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.


9 जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली होती. नवजात शिशूंसाठीच्या विशेष अतिदक्षता विभागात, म्हणजेच Special Newborn Care Unit (SNCU) मध्ये आग लागल्यानं ही घटना घडलेली. एकूण 17 बालकांना या अतिदक्षता विभागात ठेवलं होतं, पैकी 7 बालकांना अग्निशामक दलाकडून वाचवण्यात आलं होतं. यात अगदी एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळापासून ते तीन महिन्याच्या बालकांचा समावेश होता..