अहमदनगर : अहमदनगरमध्ये काल ऑक्सिजनअभावी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मॅक्स केअर नावाच्या मोठ्या रूग्णालयात 100 ते सव्वाशे कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्या रुग्णालयासह नगर शहरातल्या अनेक खाजगी रुग्णालयातला ऑक्सिजनचा साठा संपत चालला होता. धावाधाव केल्यावर पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथून ऑक्सिजनचा एक टँकर निघाला. तो पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अडवला. मुख्यमंत्र्यांपर्यंत फोनाफोनी झाली. अतिशय शेवटच्या क्षणी ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये दाखल झाला त्यामुळे पुढचा धोका टळला.


अहमदनगरमध्ये काल शहरातील बहुतांश रुग्णालयातील ऑक्सिजन संपत चालले होते. काही खाजगी रुग्णालयांनी ही बाब जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर शहरातल्या औद्योगिक वसाहतीतून एक टँकर उपलब्ध झाला. दुसरे दोन टँकर रात्री मिळणार होते. त्यातील एक टँकर शहरात आल्यावर बंद पडला. पहाटे अडीचच्या सुमारास पोलिस, यंत्रणा आणि तरुण कार्यकर्त्यांनी त्यासाठी धडपड करून हा टँकर जिल्हा रुग्णालयात पोहोचता केला. नगरला रात्री दोन टँकर मिळाले त्यामुळे किमान आज दिवसभराची चिंता मिटली आहे.


पण त्या आधी आणीबाणीची वेळ...
अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी विशेष लक्ष घालून अहमदनगरसाठी चाकण एमआयडीसीतून ऑक्सिजन उलब्ध करून दिला. तो टँकर पुणे जिल्ह्यासाठी होता. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी चाकणच्या बाहेर पडलेल्या टँकरला सुमारे 10 किलोमीटर अंतरावर उभा रहायला सांगितले. नंतर बरीच फोनाफोनी झाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत फोनोफोनी केल्यावर राजेश देशमूख यांनी टँकर अहमदनगरकडे जावू दिला. तो टँकरही वाटेतच बंद पडला. रात्री काही तरूणांनी धावपळ करून हा टँकर दुरूस्त केला. हा ऑक्सिजन टँकर शेवटी दीड वाजता अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात पोहचला. ह्या टँकरमध्ये 20 टन लिक्वीड ॲक्सिजन आहे. त्यातले 14 टन ॲक्सिजन उतरवून घेण्यात आले. बाकीचे ॲक्सिजन खाजगी रुग्णालयांना दिले. हा प्रकार पहाटे चारपर्यंत चालला होता.


असं काही झालेच नाही...


एबीपी माझावर अहमदनगर मधल्या ऑक्सिजन आणिबाणीची बातमी येईपर्यंत प्रशासन काहीही बोलायला तयार नव्हते. माझाच्या बातमीनंतर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी घटनाक्रम सांगितला. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार काल रात्री चाकणहून नगरला जाणारा ऑक्सिजनचा टँकर पुणे जिल्ह्यात थांबवण्यात आला होता. बाळासाहेब थोरात यांनी मुख्य सचिवांना संपर्क करून नगर जिल्ह्याकडे निघालेला टँकर थांबवणे योग्य नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर नगरकडे टँकर निघाला. त्यामुळे राज्यात सर्व जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडीसीविरचं वाटप समान व्हावं अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.