Ahmednagar akole news : सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पाऱ्यानं उच्चांक (Maharashtra Weather Update) गाठला आहे. राज्यातील अनेक तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. माणसांची पाण्यासाठी वणवण होत असताना जंगली प्राण्यांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. जंगली प्राणी, पशु-पक्षी देखील पाण्याच्या शोधात आहे. अशात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने जंगलातील एका गुहेत जाऊन बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात वन कर्मचारी अशोक घुले त्यांचे सहकारी गेले होते. जंगलात खड्डे खोदण्याचे काम करत असताना त्यांना बिबट्याच्या बछड्यांचा आवाज आला. त्यावेळी ते आणि त्यांचे सहकारी गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. कर्मचारी अशोक घुले यांची ही माहिती वन क्षेत्रपाल प्रदीप कदम यांना दिल्यानंतर कदम त्यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.
कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका टोकरीत पाणी उपलब्ध करुन दिले. यावेळी त्यांनी एका बिबट्याच्या बछड्याला चक्क बाटलीने पाणी पाजले. हे काम करत असताना त्यांच्या एका सहकाऱ्यानं व्हिडिओ शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अशोक घुले हे अनेक दिवसांपासून वनविभागात कर्मचारी म्हणून काम करत आहे. विहिरीत पडलेला बिबट्या बाहेर काढणे, मानव वस्तीत घुसलेला बिबट्या सुरक्षित बाहेर काढणे, बिबट्यांविषयी जनजागृती करणे यासह अकोले तालुक्यात बिबट्यांच्या रेस्क्यू टीममध्ये त्यांनी अनेकदा आपल्या कामाची छाप पाडली आहे.
वन कर्मचारी अशोक घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेअरिंगबाज कामाचे पुन्हा एकदा प्राणी मित्र तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :