अहमदनगर : अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील झगडे फाटा इथून प्रवाशांना कोपरगावकडे घेऊन जाणाऱ्या अॅपे रिक्षाला कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन तरुणी, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर गाडीसह पसार झालेल्या कंटनेर चालकाला नागरिकांनी पकडू पोलिसांच्या ताब्यात दिलं. दर्शन सिंह असं कंटेनर चालकाचं नाव असून तो लुधियाणा इथला रहिवासी आहे. 


नागपूर-मुंबई महामार्गावरील सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी, दोन महिला आणि दोन पुरुषांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जखमी महिलेचे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील काहींची प्रकृती अत्यवस्थ आहे. 


अपघातानंतर तिथून पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. अपघाताच्या या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे..


अपघातातील मृतांची नावे
1. राजाबाई साहेबराव खरात (वय 60वर्षे रा. चांदेकसारे)
2. आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65 वर्षे रा. वावी)
3. पूजा नानासाहेब गायकवाड (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. हिंगणवेढे) 
4. प्रगती मधुकर होन (महाविद्यालयीन विद्यार्थिनी, वय 20 वर्षे रा. चांदेकसारे)
5. शैला शिवाजी खरात (वय 42 वर्षे रा.श्रीरामपूर)  
6. शिवाजी मारुती खरात (वय 52 वर्षे, रा. श्रीरामपूर)
7. रुपाली सागर राठोड (वय 40 वर्षे  रा. सिन्नर)


रिक्षातील जखमींची नावे
1. विलास साहेबराव खरात (वय 34 वर्षे रा. चांदेकसारे)
2. कावेरी विलास खरात (वय 5 वर्षे, रा चांदेकसारे)
3. धृव सागर राठोड (वय 17 वर्षे, रा.सिन्नर)


मोटारसायकलवरील जखमी
1. मोटार सायकलवरील दिगंबर चौधरी (वय 42 वर्षे) 
2. त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय 12 वर्षे)
3. बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय 42 वर्षे, रा. पोहेगाव) हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर एस.जे.एस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.