Shivsena Vs BJP : मुंबईतील वांद्रे येथील बँड स्टॅण्डजवळील भूखंड विक्रीच्या व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी या भूखंड विक्रीवरून सरकारला लक्ष्य करत चौकशीची मागणी केली आहे.
वांद्रे पश्चिम येथील बँड स्टॅण्ड या उच्चभ्रू ठिकाणाजवळ असणाऱ्या ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी एक एकर 5 गुंठे एवढा शासकीय मालकीचा भूखंड आहे. हा भूखंड रूस्तमजी विकासकाला कवडीमोल किमतीत देण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विक्री व्यवहाराला स्थगिती देऊन त्याची विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
सन 1905 मध्ये एका धर्मादाय संस्थेला नर्सिंग होम बांधण्यासाठी हा भूखंड भाडेपट्ट्यावर देण्यात आला होता. मात्र, एवढ्या वर्षात संबंधित संस्थेने या जागेचा वापर केला नाही आणि हा भाडेपट्टा करार 1980 मध्ये संपला होता असे दरेकरांनी म्हटले. मुंबई विकास आराखडा 2034 नुसार या भूखंडावर Rehabilitation Centre असे आरक्षण दाखवण्यात आले आहे. विकास आराखड्यासाठी दाखवण्यात आलेल्या कारणासाठी या जागेचा वापर होणे आवश्यक होते व अटीनुसारच धर्मादाय संस्थेला भाडेपट्ट्याने हा भूखंड देणे नियमानुसार अपेक्षित होते. मात्र, संबंधित संस्थेने नियमबाह्य पद्धतीने हा भूखंड विकण्याची जाहिरात प्रसिद्ध केली असून शासनाने ही भूखंड विक्रीची परवानगी दिली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
रुग्णसेवेसाठी असलेला हा भूखंड संबंधित संस्थेने रुस्तमजी या विकासकाला 234 कोटी रुपयांना विकला असून भूखंडाचा दर शासकीय रेडी रेकनरनुसार 324 कोटी रुपये आहे. तर, बाजारभावानुसार अधिक दर असल्याचा दावा दरेकर यांनी केला.
या भूखंड विक्रीचे प्रकरण संशयित आणि अतिशय गंभीर असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. खासगी विकासकाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अनियमितता, बेकायदेशीर कामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.