Rice Procurement : देशात सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी   (Rice Procurement) सुरु आहे. खरीप विपणन हंगाम 2022-23 साठी आत्तापर्यंत 702 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी 20 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. 96 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना (Farmers) सुरू असलेल्या खरेदी प्रक्रीयेचा लाभ झाला आहे. आत्तापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 45 हजार 845 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.


Rice : देशात पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध 


खरेदी प्रक्रियेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत मध्यवर्ती साठ्यात खरेदी केलेल्या तांदळाच्या तुलनेत वितरण सुमारे 218 लाख मेट्रीक टन आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात 702 लाख मेट्रीक टन तांदळाची खरेदी झाली आहे. मागील  2021-22 च्या हंगामात 749 लाख मेट्रीक टन तांदळाची खरेदी झाली होती. यावर्षी 765.43 लाख मेट्रीक टन तांदळाच्या खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


तांदळाच्या किंमती कमी होण्याची शक्यता


केंद्र सरकारकडून तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार तांदळाच्या निर्यातीवर (Rise Export) घातलेले निर्बंध मागे घेण्याची शक्यात आहे. देशांतर्गत बाजारात तांदळाच्या वाढत्या किमती स्थिर झाल्यानंतर आणि पुरवठ्यात सुधारणा झाल्यानंतर सरकार तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सरकार आपल्या साठ्यातील तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचाही विचार करत आहे. केंद्र सरकारकडे तांदळाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कल्याणकारी योजनांद्वारे तांदूळ पुरवण्यात सरकारला कोणतीही अडचण येणार नाही. संपूर्ण जगात भारताचा तांदूळ व्यापारातील वाटा सुमारे 40 टक्क्यांच्या घरात आहे. भारताने तांदळाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध मागे घेतल्यास जगभरातील तांदळाच्या किमती खाली येण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. अन्नधान्याच्या महागाईत घट झाल्यानंतर सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. 


3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी करता येणार


केंद्र सरकारने तांदूळ खरेदीबाबत सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकारे भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) 3 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी करू शकतात. त्यामुळं राज्यांना आता  34 रुपये किलो दरानं तांदूळ मिळणार आहे. राज्यातील गरिब लोकांच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवत आहेत. या योजनांसाठी राज्य सरकारला FCI कडून 34 रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rice Price : आता तांदळाच्या किंमतीही कमी होणार, कारण... वाचा केंद्र सरकारची नवीन नियमावली