Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पैसे देऊनही इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे. ही मारहाण मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांकडून (Students) करण्यात आली आहे. भरभक्कम पैसे घेऊन पास करुन देण्याची हमी ग्रामीण भागातील काही संस्था देतात, त्यासाठी त्यांनी एजंट देखील नेमल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचे वृत्त अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.


पोलिसात तक्रार दाखल नाही


काल (21 फेब्रुवारी) बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पहिल्या पेपरलाच पाथर्डी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी न पुरवल्यानं मुंबई-पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून माणिकदौंडी रस्त्यावर एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसात तक्रार झाली नसून, पुढील पेपरला आपल्याच पाल्यांना अडचण होईल म्हणून पालकांनी तक्रार दिली नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी पोलि स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्याची माहिती देखील मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यातील संभाषणावरुन हे स्पष्ट होते की, पालक संबंधित संस्था चालकांशी फोनवरुन कॉपीबाबत बोलत आहेत. मात्र, याची पुष्टी पोलिसांनी करणं गरजेचं आहे. एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, या प्रकरणामुळं विद्यार्थ्यांचे पालक देखील अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


 कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा


राज्यभरात कालपासून बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली आहे. ही परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवलं जात आहे. मात्र, पाथर्डीत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. कॉपी पुरवल्यानं एजंटलाच विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. हमखास पास होण्याची गॅरंटी असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर मुंबई पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. हे विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात गेले होते. 


कसं आहे  कॉपीमुक्त अभियान?


परीक्षा केंद्राच्या आतमध्ये जाण्याआधी शंभर टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा परीक्षा केंद्रांवर सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाय कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत. 


 


महत्त्वाच्या बातम्या:


Reality Check : बारावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान कशाप्रकारे राबवलं जातंय?