Marathwada Rain Update : आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात्र, आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते. पिकांना जगवण्यासाठी बळीराजा थेंब थेंब पाणी घालतांना पाहायला मिळतोय. असंच काही चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावात पाहायला मिळत आहे. अख्ख शेतकरी कुटुंब हातात बादल्या, तांबे घेऊन एका एका रोपाला पाणी टाकून जगवण्याचं प्रयत्न करतोय. पण, अशी धरपड किती दिवस करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी 20 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकं आता माना टाकताना पाहायला मिळत आहे. अशीच काही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यासह विभागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. पण आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आटले...


यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस पडत नाही त्यात विहिरीत पाणी नसल्याने पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. त्यात पाणी नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक भागात शेतकरी हाताने पिकांना पाणी टाकताना पाहायला मिळत आहे. 


राज्यातील पावसाची परिस्थिती...



  • कोकण विभाग (28 टक्के पाऊस) : सरासरी 766 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 217 मिलिमीटर पाऊस झाला.

  • नाशिक विभाग (20 टक्के पाऊस) : सरासरी 197  मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 40 मिलिमीटर पाऊस झाला.

  • पुणे विभाग (22 टक्के पाऊस) : सरासरी 247 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 54 मिलिमीटर पाऊस झाला.

  • औरंगाबाद विभाग  (22 टक्के पाऊस) : सरासरी 193 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 44 मिलिमीटर पाऊस झाला.

  • अमरावती (29 टक्के पाऊस) : सरासरी 231 मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात 68 मिलिमीटर पाऊस झाला.

  • नागपूर (55 टक्के पाऊस) : सरासरी 347 मिलिमीटर पाऊस पडतो, 193 प्रत्यक्षात  मिलिमीटर पाऊस झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


राज्यात भीषण दुष्काळाची भीती; मराठवाड्याकडे तर पावसानं फिरवलीये पाठ, बळीराजा संकटात