Milk Price : दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण दुधाच्या दरात (Milk Price) मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झाले आहे. किसान सभेनं (Kisan Sabha) देखील आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. 


राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या आदेशाची होळी


दरम्यान, दुधाला 34 रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीने शासन आदेश काढला होता. मात्र, हा शासन आदेश राज्यातील दूध संघ  आणि दुध कंपन्यांनी धुडकवला आहे. त्यामुळं दुधाचे भाव हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या विरोधात राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी दूध संकलन केंद्रांवर आदेशाची होळी करून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे.



 


दुधाचे दर 34 रुपयांवरुन 27 रुपयांवर 


राज्यात सध्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुधाचे दर हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांवर आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाची राज्यभर होळी देखील करत आहेत. आज राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या 34 रुपये दर देण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली. 


दूध उत्पादक शेतकरी अडचणीत


राज्यात दुध संघ आणि कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळं निर्माण होणारी अस्थिरता संपवण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खासगी आणि सहकारी दूध संघांचे दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत. दुध संघांनी आणि  कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला 34 रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारुन दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसवण्यात आला आहे. 34 रुपयांऐवजी बेस रेट 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले.  


मागणी वाढली असताना दर वाढणे गरजेचं


दुष्काळ असल्यानं दुधाचे उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते. मात्र, याउलट मागणी कमी आणि उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दुध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा आहे. शिवाय या सोबतच राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दुध निर्मिती हेही दर कोसळण्यामागचे एक  मोठे  कारण आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: