अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एल्गार पुकारल्यानंतर त्याला प्रतिकार म्हणून मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर आता सहकारी मंत्र्यांकडूनही अप्रत्यक्ष कानउघडणी सुरु आहे. आता महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांचे अप्रत्यक्ष कान टोचले आहेत.  


ओबीसींचे आंदोलन उभा करायचं हे योग्य नाही 


राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध करताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारची संमती आहे. मात्र, दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली असेल तर जरांगे पाटलांनी देखील संयम ठेवायला हवा. छगन भुजबळ यांनी जो ओबीसीचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव ठीक होता. पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभा करायचं हे योग्य नाही असं राधाकृष्ण विखे यांनी सांगत कानउघडणी केली आहे. 


संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम


दरम्यान संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांच्यावर कशाला वेळ घालवायचा असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यावर बोलताना विखेंनी राऊतांना टोला लगावला.


दुध दरावर काय म्हणाले? 


दूध दराबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. सध्या दुधाची आवक प्रचंड आहे. पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्वर्जन करायचे, त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने त्याची निर्यात पूर्णपणे थांबून गेली आहे. निर्यातीला जर आपण प्रोत्साहन देऊ शकलो आणि कन्वर्जनला जर संधी मिळाली तर भाव वाढण्यात मदत होईल. भेसळ दुधासंदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे दूध दर वाढीसाठी मदत होईल अशी आशा राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केली.


इतर महत्वाच्या बातम्या