Swabhimani Shetkari Saghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. ऊसाच्या यंदाच्या हंगामात पहिली उचल 3700 जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. गेल्या हंगामातील ज्यादाचे प्रतिटन 200 रुपये देण्याची मागणी केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी साखर आयुक्त पुणे यांना पत्र लिहलं आहे. मागणीवर येत्या 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे. 


ऊस परिषदेत देखील राजू शेट्टी यांना ऊसाची पहिली उचल 3700 रुपये देण्याची मागणी केली आहे. तसेच मागच्या हंगामातील 200 रुपये द्यावे असी मागणी केली होती. आता या हंगामातील साखर कारखाने सुरु झाले आहेत. 15 नोव्हेंबरपासून ऊसाचा गळीत हंगामा सुरु होणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळं ऊसाचा हंगाम उशीरा सुरु झाला आहे. कडक उन्हामुळं ऊसतोडणी मजुराकडून व ऊसतोडणी मजुराकडून  शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. एकरी 5 ते 10 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रात म्हटलं आहे. 


15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


सोलापूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याने 10.80 टक्के रिकव्हरी असूननही 3500 रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. तर 123 ते 12. 30 टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्याने ऊसतोडणी वजा जाता 3700 रुपयांचा दर देण्यास काहीही अडचण नसल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रात म्हटलं आहे. येत्या 15 दिवसात जर ऊसाच्या दराबाबत काही निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी मागणी करून देखील साखर आयुक्तांच्या नियंत्रणा खाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून एकाच सिस्टिममधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत, अशी मागणी देखील ऊस परिषदेत केली होती. तसेच राज्यातील ऊस तोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातलेला आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी स्वाभिमानी उस वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. ज्या मुकादमांनी फसवले आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून उस वाहतूकदारांचे पैसे वसूल करून यावेत. अथवा मुकादमांनी पैसे बुडविलेल्या वाहनधारकांचे कर्ज माफ करावे अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली होती.