CM Thackeray Meets PM Modi : शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटी दरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली., असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या वैयक्तिक भेटीची माहिती दिली. पंतप्रधानांना आपण स्वतः भेटलो, त्यांना एकटे भेटलो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही." असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सुमारे दीड तास चार नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. "राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल," असं मुख्यमंत्री म्हणाले
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेतली. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :