मुंबई:   गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain)  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे  31 मे पर्यंत देणार असल्याची माहिती  कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानपरिषदेत दिली आहे.  नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिलेत असे देखील सत्तार म्हणाले. 


 सत्तार म्हणाले,  प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतक-यांना 2305  कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारला काही अधिकार नाहीत. ज्या जाचक अटी आहेत. 


राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकार स्थापन होताच राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात येणार असल्याचा दावा केला होता. पण असे असताना राज्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ  शेतकऱ्यांनी  गळफास घेत आत्महत्या केली आहे. 


पंचनाम्यांना ब्रेक


सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


शेतकऱ्यांना मदत करावी.... 


अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेले गहू, ज्वारी, हरभरा, केळी, पपई आणि मिरची तसेच शेतात पडून आहे. जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतीमाल तसाच पडून आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झालेला शेतीमाल पंचनामे होण्याचा अगोदर काढून घेतला तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भीती आहे. पंचनामे होत नसल्याने एकीकडे झालेले नुकसान तर निसर्गामुळे झालेले नुकसान असा दुहेरी मार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने काढून घेतला आहे. त्यातच संपाच्या मानवनिर्मित संकटाचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.