CM Uddhav Thackeray : संकटे येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माता भगिनी तळ हातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. शेतकऱ्यांना हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार नाही. आपले सरकार हे बेशरम नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.


शेतकरी हे कृषीप्रधान देशाचे वैभव


अन्न दाता सुखी असेल तर देशही सुखी राहतो. आपल्या कृषीप्रधान देशाचे सर्व शेतकरी हे वैभव आहेत. शेतकरऱ्यांचे श्रमाचे मोल करणारे सरकार आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे असे देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो नाही. मात्र, आता राज्याच अर्थचक्र गती घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांचे शेतात हाल होतात. आम्ही वर्क फ्रॉम होम करतो, पण शेतकऱ्यांना ते शक्य नाही. संकटे येतात जातात, मात्र शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय माता भगिनी तळ हातावरील फोडाप्रमाणे शेती पिकवतात असेही ठाकरे म्हणाले.



अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते


आपल्याकडचे गहू, तांदूळ हे आरोग्यदाई आहेत. अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते असे मुख्यमंत्री म्हणाले. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसते असेही ते म्हणाले. निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी घोषणा करणारं आपलं सरकार नाही. आपले सरकार बेशरम नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी संकटाच्या काळातही वेगवेगळे  प्रयोग करत असतात. राहीबाई यांनी बियाणे बँक तयार केली आहे. आपण बँक घोटाळे बघितले, पण बियाणे बँक ही कल्पनाच वेगळी असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.