लातूर : लातूर ग्रामीणच्या जागेवरून आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जागा शिवसेनेनं आणि काँग्रेसने फिक्स केली होती, असा गौप्यस्फोट करून संभाजी पाटील निलंगेकर यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. यावर युतीत हे झालंच कसं? असे मी थेट संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारणा करणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटलं. निलंगेकर यांना प्रतिआव्हाण करत देशमुखांच्या प्रश्नाला थेटच समोरच उत्तर देऊ म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी दाखवून दिलं.


धीरज देशमुख यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने फिक्सिंग केली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभेची भाजपाची जागा ऐनवेळी शिवसेनेला देण्यात आली होती. शिवसेनेनं सचिन देशमुखसारखा कोणालाही माहिती नसलेला अतिशय नवखा उमेदवार दिला. या जागेवर सेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. हे शल्य अनेक भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहेच. हीच खंत कोणताही नेता जाहीर बोलून दाखवत नव्हता. मात्र भाजपाचे माजी मंत्री आज आमदार संभाजी पाटील यांनी छेद देत यावर उघड बोलून दाखवले आणि चर्चा सुरू झाली. शिवसेना आणि काँग्रेसने त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी त्यावेळी फिक्सिंग केली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.


संभाजी पाटील निलंगेकरांच्या 'फिक्सिंग'च्या आरोपावर चंद्रकांत पाटलांचं मौन!


याचे पडसाद लातूरच्या राजकारणातच नव्हे तर राज्यातही उमटत आहेत. त्यामागे काही कारणेही आहेत.


1. ऐनवेळी लातूर ग्रामीणची जागा शिवसेनाला कशी देण्यात आली?
2. शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरून तशी मागणीही झाली नव्हती. मग ऐनवेळी हा बदल का झाला?
3. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या औसा मतदार संघात दिनकर माने यांचा नैसर्गिक हक्क असताना सेनेने ती दावेदारी सोडत औसा भाजपला का दिला?
4. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपाचे तिकिट औसातून दिले होते. याचसाठी ही फिक्सिंग सेना-भाजप-देशमुख कुटुंबाने मतदार संघ बदलासाठी अट्टाहास केला का?
5. जिंकण्याची शक्यता असलेली औसासारखी जागा सोडून शक्ती नसलेल्या व ज्या मतदार संघात 'धनुष्यबाण'च माहिती नाही, अशी लातूर ग्रामीणची जागा सेनेने का स्वीकारली?
6. भाजपाच्या देवेंद्र फडणवीस गटाच्या फायद्यासाठी सेनेला लातूर ग्रामीणचा जागा दिली गेली. मात्र सेनेनं तेथे देशमुखांशी फिक्सिंग केली?
7. त्यावेळी भाजपातील गटबाजी उघड झाली. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते शांत होते. ते आज का बोलत आहेत?
8. सेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करत लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसला बाय दिली.
9. युती आणि आघाडी धर्म बाजूला सारून वैयक्तिक फायद्याची गणितं कशी जुळवली गेली?


महाराष्ट्रातलं पॉलिटिकल फिक्सिंग! लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट


यावर पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट करताना सांगितले की, जागेबाबत निर्णय युतीत झाला होता. त्यावेळीची समीकरण आता राहिली नाहीत. मग आता लोकांचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर असे आरोप करत आहेत. त्यांनाच मी स्वत: हे विचारणार आहे. कोणत्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडे त्याचा रोख आहे ते त्यांनी सांगावं. यावर संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट विचारले तर मी त्यांना थेटच उत्तर देईन असे सांगत निलंगेकरांनी प्रतिआव्हान दिलं आहे.


लातूर ग्रामीणची जागेचे त्यावेळचे प्रबळ दावेदार रमेश कराड यांना साईड कॉर्नर करत जागा सेनेला सोडण्यात आली. त्या निर्णयावर ते प्रचंड नाराज होते. मात्र आजही ते या विषयावर उघड बोलत नाहीत. युतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला यात काही अडचण वाटली असेल त्यामुळे जाग सेनेला सोडली. निलंगेकर आमचे नेते आहेत. ती घटना त्यांनी जवळून पाहिल्या असतील ते बोलले आहेत. त्यावर मी काय बोलावे? असं म्हणत त्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना सूचक पाठींबा दिला आहे.


विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्नेह संपूर्ण राज्याला माहीतच आहे. अमित देशमुख यांच्या लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या निवडणुकीत शहरची जागा भाजपाची असताना ती सेनेला सोडण्यात आली होती. त्यावेळी नवीन रचनेत तयार झालेल्या लातूर ग्रामीणची जागा भाजपाच्या वाटयाला आली होती. तिसऱ्याच निवडणुकीत भाजपाने ती जागा सोडत सेनेला दिली. हक्काची आणि विजयाची पूर्ण खात्री असणारी  औसाची जागा सेनेने सोडली. त्यावेळी ही युती आणि आघाडी धर्मापेक्षा मित्रधर्म प्रबळ ठरला होता. तोच पाठ पुढची पिढी गिरवत आहे.





Assembly Elections | लातूर ग्रामीण जागेसाठी विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग, संभाजी निलंगेकरांचा आरोप