Baba Siddiqui : राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस सोडली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. खुनाच्या 28 तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे जबाबदारी घेताना म्हटले आहे. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुप आणि अनमोल बिश्नोईला हॅशटॅग करण्यात आलं आहे. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. त्याच्याच टोळीकडून 14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. 


मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ


दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही गस्ती वाढवण्यात आली आहे. मलबार हिल परिसरातील अतिमहत्वाच्या पाँईंटवर  नाकाबंदी करण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.  


3 पैकी 2 शूटर्सना अटक, एकजण फरार


हरियाणा आणि यूपीच्या शूटर्सनी हत्या केली. पोलिसांनी 3 पैकी 2 शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक शूटर हरियाणाचा तर 2 उत्तर प्रदेशातील बहराइचचा आहे. ते 40 दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दिकी यांचे घर आणि मुलग्याच्या कार्यालयाची रेकी करत होते. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झीशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये आलेल्या 3 शूटर्सनी दोन बंदुकांमधून 6 राऊंड फायर केले. बाबांना तीन गोळ्या लागल्या. त्याच्या पोटात 2 आणि छातीवर 1 गोळी लागली. तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते.


 दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलिंगला दुजोरा दिला आहे. शिव, धर्मराज आणि गुरमेल अशी या हत्येतील आरोपींची नावे आहेत. शिव आणि धरमराज हे बहराइच, यूपीचे रहिवासी आहेत, दोघांचा यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे. धर्मराज आणि गुरमेल यांना अटक करण्यात आली आहे. शिवा फरार आहे. त्याला या हत्येचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या