गोंदिया : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी  (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 


आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय : देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या घटनेतील दोन आरोपी पकडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मात्र, त्या संदर्भात आता लगेच बोलणं योग्य नाही. आज आरोपींची कस्टडी झाल्यानंतर पोलीस या संदर्भात माहिती देतील, असे त्यांनी म्हटले आहे.  


देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर


आता चौकशी नको सरकारमधून बाहेर पडा, असे म्हणत शरद पवार यांनी बाबा सिद्दिकी प्रकरणावरून हल्लाबोल केला. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सुरक्षा पाहायची आहे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत. त्यांनी खुर्चीकडे बघावे, त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावे, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिले आहे.  


संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका


संजय राऊत म्हणाले की, दिवसा जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणीसत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगात मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले आहेत. आमच्या डोळ्यासमोर त्यांचा अधपतन आम्ही पाहिलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे की, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय. 


आणखी वाचा 


Baba Siddique Shot Dead : सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार कडाडले, उच्चस्तरीय चौकशीची मागणी