मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. परंतु आता निवाळलेले हे वादळ दोन-तीन दिवसात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नव्याने निर्माण होणारे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होणार असून त्याचं नाव शाहीन असणार आहे. शाहीन हे नाव कतारकडून देण्यात आलेलं आहे. भारतावर याचा प्रभाव नसणार आहे आणि चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. 


पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा


गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.  पश्चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. 


कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी


आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 जिल्ह्यांना आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगावसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.  काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


आज मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळ्यासाठी आॅरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 64 मिमी ते 200  मिमीपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 


उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज


उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्यासाठी नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, धुळे आणि नंदुरबारसाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इम्पॅक्ट वाॅर्निंग जारी


उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इम्पॅक्ट वाॅर्निंग जारी करण्यात आले आहे. सखल भागात पाणी साचणे, मुसळधारेमुळे दृश्यमानता कमी होणे, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणे, उभ्या पिकांचे नुकसान, कच्चे बांधकाम कोसळणे, माती खचण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता आहे.