नांदेड/यवतमाळ : आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या (MH 14 BT 5018) या एसटीच्या हिरकणी बसचा अपघात झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावरील दहागाव नाल्यावर ही दुर्घटना घडली. दरम्यान, या अपघातात 2 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत तर एकाचा शोध सुरू आहे. ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्याची सरकार जबाबदारी घेईल. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून पाण्यात बस घालू नये, अश्या वाहन चालकांना सक्त सूचना देण्यात येतील आणि यामध्ये चूक कोणाची आहे याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहे.


नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.


या एसटी बसमध्ये 2 कर्मचारी व 4 प्रवाशी होते. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्यात दोन प्रवाशांना जिवंत वाचवण्यात आलं असू तिघांना मयत बाहेर काढण्यास स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने यश आलंय. तर एकजणाचा शोध सुरू आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.